मिळालेल्या माहितीनुसार, कोळी आळीमधील दुर्गा माता मंडळाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. मिरवणूक कोळी आळीमध्ये दिलीप रिंगे यांच्या घरासमोर असताना जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील सात ते आठ मुले भाजली आहेत. मुलांच्या अंगावरील सर्व कपडे जळाले आहेत. सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व जखमी मुलांना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर प्रशासनही खडबडून जागे झाले असून तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचप्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. सध्या सर्व मुले सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी नगरसेवक संतोष आबा शिंदे हे स्वतः जखमी मुलांसोबत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीदेखील या घटनेची माहिती घेतली. तेही सातारा येथील रुग्णालयाच्या संपर्कात आहेत. महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत हेदेखील आपल्या सहकारी कर्मचारी यांच्यासह तातडीने रुग्णालयात पोहचले. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य केले. पोलीस कर्मचारी हे रुग्णालयात जखमींना मदत कार्य करत होते.