• Sat. Sep 21st, 2024
आता माझी माणसं संयम ठेवणार नाही, आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधणार : पंकजा मुंडे

भगवान भक्तीगड, सावरगाव : मी ग्रामपंचायतची देखील सदस्य नसताना शिवशक्ती परिक्रमा यात्रेत लोकांनी माझ्यावर जेसीबीने फुलांची उधळण केली. मी लोकांना काय दिलं, हाच मला प्रश्न पडला. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा लोकांनी दोन दिवसांत ११ कोटी जमा केले. लोकांना अंथरायला सतरंजी देता आली नाही, मी त्यांना खाऊ घालू शकले नाही. तुम्ही आज उन्हात बसलात म्हणून स्टेजवरच्या लोकांना देखील मी उन्हात ठेवलंय. कारण माझी माणसं उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला सत्तेपासून तुम्ही दूर ठेऊ शकत नाही, असा इशाराच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना दिला.

परंपरेप्रमाणे विजयादशमीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगड येथे दसरा मेळावा संपन्न होतोय. पंकजा मुंडे यांच्या हजारो समर्थकांनी तसेच भगवान बाबांना मानणाऱ्या भाविकांच्या गर्दीने गड फुलून गेला आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी सुरूवातीला तडफदार भाषण केलं. लगोलग पंकजा भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी सुरुवातीलाच भावनिक साद घालत मी ताईच्या नाही तर आता तुमच्या आईच्या भूमिकेत आलीये, असं सांगत लोकांच्या काळजाला हात घातला. त्यानंतर त्यांनी शेतकरी, शेतमजूर, मराठा आरक्षण, ऊसतोड मजुरांचे प्रश्न आदी विषयांवर रोखठोक भाष्य केलं.

भाजप नेत्यांना पंकजांचे सवाल

माझ्या आयुष्यातली एखादी निवडणूक मी हरली असेल पण तुमच्या नजरेत मी कधी पडली नाही. इथे धनगर, माळी, मराठा, मुस्लीम अशा सगळ्या समाजाचे लोक आलेत. देशात सगळं आलबेल आहे म्हणून तुम्ही मेळाव्याला आला आहात का? शेतकरी सुखी आहेत का? शेतकऱ्यांना विमा मिळाला का? अनुदान मिळालं का? शेतमजुराच्या हाताला काम आहे का? महाराष्ट्रात खूप सारे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना, सरकारकडून खूप अपेक्षा आहेत, आता अपेक्षाभंग सहन करू शकत नाही, असं रोखठेकपणे पंकजांनी सांगितलं.

आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर आपण उन्हात बांधू

दरवेळी तुम्ही आशा लावता, तुमचा अपेक्षाभंग होतो, यासाठी मी तुमची माफी मागते. पण आता माझी माणसं संयम दाखवणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर आपण उन्हात बांधू, शिवशंकर भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे, असा रोखठोक इशाराच पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना दिला. त्याचवेळी “न जाने कैसा मुझे परखता है मेरा उपरवाला… इम्तेहान भी सख्त लेता है पर हारने नही देता…”, अशा शब्दात आपल्या जीवनाचं सूत्र सांगितलं.

बीडमधून लढा वगैरे असलं काही चालणार नाही

मला अनेक जण माझ्या मतदारसंघातून लढा असं सांगत असतात. प्रीतम ताईंच्या बीड लोकसभा मतदारसंघातून लढा असंही काही जण म्हणत आहेत. पण तसलं काही चालणार नाही. एखाद्याच्या कष्टाचं मी खाणार नाही. कापूस वेचायला जाईल, ऊस तोडायला जाईल पण मेहनतीचं खाईल… असं सांगून पुढील दिशाच पंकजांनी स्पष्ट केली.

जिथं लोकांचं भलं असेल त्याच ठिकाणी पंकजा झुकेल

सकाळी मोहन भागवत यांचा दसरा मेळावा झाला. त्यांनी सांगितलं, नितीमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं हे देशाच्या हिताचं नाही. जिंकण्यासाठी नितीमत्ता, निष्ठा घाण ठेऊ शकत नाही. जोपर्यंत मी शिवशक्ती परिक्रमा केली नव्हती, मला असं वाटायचं मी बँकांची कर्जदार आहे, मला वाटायचं मी पक्षाची सच्ची कार्यकर्ता आहे. पण त्यानंतर मला दैवी साक्षात्कार झाला, मला नंतर कळलं दोन दिवसांत ११ कोटी जमा करणाऱ्या लोकांची मी कर्जदार आहे. ज्याठिकाणी तुमचं भलं आहे, त्याचठिकाणी पंकजा मुंडे नतमस्तक होईल, असा शब्द पंकजांनी समर्थकांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed