• Mon. Nov 25th, 2024

    ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड

    ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. त्यामुळे या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) ‘ससून’मधून चालणाऱ्या तस्करी प्रकरणी सोमवारी कांबळेला आरोपी करण्यात आले. यापूर्वी तिच्यावर आरोपीला पळून जाण्यास मदत करण्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते.

    ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अॅड. कांबळे आणि अर्चना निकम या दोघींना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी या दोघींचा ताबा घेऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक केली. त्या दोघींना शिवाजीनगर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ती संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

    Nilesh Rane: राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

    कांबळेदेखील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय होता. ललित पाटीलने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर नाशिकला जाऊन दोघींची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी २५ लाख रुपये हस्तांतर केल्याचे निष्पन्न झाले. कांबळे हिला ‘एनडीपीएस’अंतर्गत आरोपी करण्यासंदर्भातील माहिती तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. पोलिस कोठडीचा कालावधी राखीव ठेवून दोघींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    भूषण पाटील, बलकवडे कोठडीत

    ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात अनेक आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे फरार आरोपींना अटक करून तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल करायचे आहे. त्यामुळे दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयीन कोठडी देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना नसल्याने हा गुन्हा ‘एनडीपीएस’च्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला. त्यानंतर दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed