कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारण दहा लाखांवर शेतकरी तीस लाखांपेक्षा अधिक लिटर दूध रोज डेअरींना घालतात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेकांनी याला प्राधान्य दिले आहे. पण यंदा गायीच्या दुधाला मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने अनेक संघांनी दर कमी केले आहेत. पावसाळा संपला तरी या भागात पुरेसा पाऊस पडला नाही. वळीवानेही हजेरी न लावल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत.
अशा परिस्थितीत दूध संघाकडून दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदा बोनस जाहीर करण्यात आला आहे. ही रक्कम तब्बल दोनशे कोटीपेक्षा अधिक आहे. यामध्ये गोकुळचा बोनस सर्वाधिक म्हणजे तब्बल १०१ कोटी तर वारणा संघाचा ७० कोटी आहे. गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, वारणेचे चेअरमन आमदार विनय कोरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील राजारामबापू दूध संघाकडून साधारणता १२ कोटी रूपये दिले जाण्याची शक्यता आहे. चेअरमन नेताजी पाटील हे येत्या आठ दिवसात याबाबत घोषणा करणार आहेत.
गोकूळचे पाच लाख, वारणा आणि राजारामबापू संघाचे प्रत्येकी दोन लाखावर उत्पादक सभासद आहेत. याशिवाय इतर खासगी संघाकडूनही मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. यातील बहुसंख्य सहकारी व चितळेसह अनेक खासगी संघाकडून बोनस दिला जाणार आहे. कठीण परिस्थितीत मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात मिळणार असल्याने दसऱ्यातच दिवाळी साजरी होण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दूध संघाकडून बोनसच्या रूपाने मोठी मदत मिळणार आहे. यामुळे त्यांची दिवाळी निश्चितचपणे गोड होणार असल्याचा आनंद आहे, असे गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी सांगितले.
असा आहे बोनस
दूधसंघ बोनस दूध संकलन
गोकूळ १०१ कोटी १६ लाख लिटर
वारणा ७० कोटी ७ लाख लिटर
राजारामबापू १२ कोटी २ लाख लिटर