• Sun. Sep 22nd, 2024

शिंक आली तरी हाड होऊ शकते फ्रॅक्चर? देशात २ पैकी एक महिला या आजाराची शिकार, वेळीच सावध व्हा

शिंक आली तरी हाड होऊ शकते फ्रॅक्चर? देशात २ पैकी एक महिला या आजाराची शिकार, वेळीच सावध व्हा

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : साधी शिंक किंवा खोकला आला तरी तुमच्या शरीरातील एखादे हाड फ्रॅक्टर होऊ शकते. पडल्यामुळे फ्रॅक्चर नेहमीच होते. मात्र, हाड फ्रॅक्चरमुळे व्यक्ती खाली पाडू शकते, ते ऑस्टिओपोरोसिस या आजारात. २० ऑक्टोबर रोजीच्या जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्ताने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी तयार केलेल्या जनजागृतीपर व्हिडीओचे लोकार्पण झाले. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. गाण्याच्या माध्यमातून गंभीर आजारावरील जनजागृतीचा अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच उपक्रम मानला जातो आहे.

कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहतात. मात्र, महिलांमध्ये मासिक पाळीनंतर कॅल्शियमचे प्रमाण कमी होते व त्यांची हाडे ठिसूळ होऊ लागतात. या आजाराची लक्षणे आधी दिसत नाही. त्यामुळे आतल्या आत हाडे पोखरली जातात. थोड्याही धक्क्याने किंवा चालता-चालताही ते तुटू शकतात. आजार झाल्याचे कळते तेंव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज डॉ. चौधरी यांनी वर्तविली. आपल्या देशात प्रत्येक दोन महिलांमध्ये एका महिलेला हा आजार आढळतो. ड जीवनसत्त्व व कॅल्शियमचा अभाव ही याची मुख्य कारणे आहेत. भारतात सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात असला तरी ८० टक्के नागरिकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे. रोज सकाळी १५ मिनिटे उन्हात राहिले तरी ही उणीव भरून निघू शकते. चांगल्या उपचारांसहच आहार व जीवनशैलीतील बदल यांमुळे या आजारावर मात करता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

मासिक पाळी बंद झाल्यावर हा आजार होतो, हेच अनेक महिलांना माहीत नाही. यात फ्रॅक्चर झालेले हाड जोडणे मोठे आव्हान असते. तसेच अनेकांना आयुष्यभर पांगळेपणा घेऊन जगावे लागते. त्यामुळे याविषयी जनजागृती झाली तर ५० टक्के भार हलका होऊ शकेल. हा विचार करूनच हा उपक्रम सुरू केल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
नवऱ्याने तलाक दिला, विहिरीत ढकललं, संकटांवर मात करत रुबिना झाल्या अनेकींचा आधार
संपूर्ण चित्रफितीत ‘करू काळजी हाडांची, जशी गाठली पन्नाशी’ हा डॉ. चौधरी यांनी लिहिलेला आरोग्य अभंग असून, संगीत मोरेश्वर निस्ताने यांनी दिले आहे.

महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असले तरी पुरुषांनाही तो होत असतो. वयाच्या पस्तिशीपर्यंत हाडे मजबूत असतात. मात्र, नंतर त्यांची झीज सुरू होते. त्यामुळे किमान पन्नाशीनंतर सर्वांनीच हाडांची घनता नियमित तपासावी व गरजेनुसार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed