राज्यातील पीक पाहणीसंदर्भातील एक अहवाल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या अहवालात वरील माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार १ जून ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील सरासरी पावसाची नोंद १०४९.९ मिमी इतकी नोंदविण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत ९२७.५ मिमी म्हणजेच सरासरीच्या ८९.१ टक्के इतका पाऊस झाला. राज्यात रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे सुरू झाली आहेत. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर व लातूर विभागात रब्बी ज्वारी, हरभरा आणि मका पिकांच्या पेरणीस सुरुवात झाल्याची नोंद अहवालात आहे.
या अहवालानुसार रब्बी हंगामासाठी यंदा एकूण तृणधान्यासाठी राज्यात ३०.७२ लाख हेक्टर इतके सरासरी क्षेत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ १.६५ लाख हेक्टर पेरणी क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण कडधान्यासाठी २२.७० लाख हेक्टर सरासरी क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी ०.०६ टक्के पेरणी क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण अन्नधान्यासाठी ५३.४१ टक्के सरासरी क्षेत्र उपलब्ध असून, त्यापैकी १.७२ टक्के पेरणी क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर तेलबियांसाठी ०.५६ टक्के सरासरी क्षेत्राची नोंद करण्यात आली असून, त्यात शून्य टक्के पेरणी क्षेत्राची नोंद आहे. या अहवालानुसार राज्यात गेल्या पाच वर्षांत एकूण पीकाखालील पेरणीसाठी ५३,९६,९६९ हेक्टर इतक्या सरासरी क्षेत्राची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी यंदाच्या १३ ऑक्टोबरपर्यंत अखेर प्रत्यक्ष पेरणीची नोंद ही १,७१,९२३ हेक्टर इतकी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आली आहे.
यंदा ३.१९ टक्केच पेरणी क्षेत्र
गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यात यंदा आत्तापर्यंत केवळ ३.१९ टक्के पीकाखालील पेरणी क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत सर्वाधिक पेरणी क्षेत्र हे रब्बी ज्वारीसाठी म्हणजेच ८.७५ टक्के इतके असून त्यापाठोपाठ रब्बी तृणधान्य ५.३८ टक्के, मका ४.५९ टक्के, रब्बी अन्नधान्ये ३.२२ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.