नवी दिल्ली 19 : जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार, 2023 लाँच केले आहे. या पुरस्कारांसाठीचे सर्व अर्ज https://awards.gov.in/Home/Awardpedia या लिंकवर ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे किंवा विभागाच्या संकेतस्थळावर (www.jalshakti-dowr.gov.in) सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
पुरस्कारांसाठी पात्रता :
कोणतेही राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा/कॉलेज, संस्था (शाळा/कॉलेज व्यतिरिक्त), उद्योग, नागरी संस्था, पाणी वापरकर्ता संघटना किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रात अनुकरणीय कार्य करणारी व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहे.
ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र:
‘सर्वोत्कृष्ट राज्य’ आणि ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’ विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित श्रेणींमध्ये – ‘सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत’, ‘सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट शाळा/कॉलेज’, ‘सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा/कॉलेज व्यतिरिक्त)’, ‘सर्वोत्कृष्ट उद्योग’, ‘सर्वोत्कृष्ट नागरी संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट वॉटर ‘यूजर असोसिएशन’, ‘बेस्ट इंडस्ट्री’, ‘बेस्ट इंडिव्हिज्युअल फॉर एक्सलन्स’ विजेत्यांना रोख बक्षिसे तसेच ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांसाठी अनुक्रमे रु. 2 लाख, रु. 1.5 लाख आणि रु. 1 लाख अशी रोख पारितोषिके आहेत.
निवड प्रक्रिया :
राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या स्क्रिनिंग समितीद्वारे तपासणी केली जाईल. निवडलेले अर्ज निवृत्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीसमोर ठेवले जातील. त्यानंतर, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या संस्थांद्वारे निवडलेल्या अर्जांची छाननी केली जाईल, म्हणजे केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल बोर्ड (CGWB). ज्युरी समिती अहवालाच्या आधारे अर्जांचे मूल्यांकन करेल आणि विजेत्यांची शिफारस करेल. समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्री (जलशक्ती) यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केल्या जातील.
‘जल समृद्ध भारत’ या सरकारच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी देशभरातील राज्ये, जिल्हे, व्यक्ती, संस्था इत्यादींनी केलेल्या अनुकरणीय कार्य आणि प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार (NWA) ची स्थापना करण्यात आली. पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांना जागरुक करणे आणि त्यांना पाणी वापराच्या सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे हा त्याचा उद्देश आहे. विविध श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तिपत्र, ट्रॉफी आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.
000000000000000
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 189, दि.17.10.2023