• Mon. Nov 25th, 2024
    भरधाव गाडीची नऊ वाहनांना धडक, मोपेड २० फूट उंच उडाली, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

    कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बेदम चोप दिला. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कसबा बावडा ते सीपीआर चौककडे जाणाऱ्या रोडवर महावीर कॉलेज समोर काल रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे.

    डोक्यावर चारचाकीचे चाक गेल्याने कवटी फुटून मृत्यू

    घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जीएसटी विभागातील एसयूव्ही चारचाकी गाडी क्रमांक MH10EA9495 ही कार चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर (वय २९ वर्ष, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) हा मद्यपान करून कसबा बावडाकडून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत होता. तो मोठ्या प्रमाणात नशेत असल्याने भरधाव वेगाने येत रमणमळा ते मेरी वेदर मैदान दरम्यान दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर त्याने गाडी न थांबवता आणखी वेगाने तो महावीर कॉलेज चौकात आला.

    याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयकडून बॅडमिंटन खेळून वरुण रवी कोरडे (वय २२ वर्ष, रा. प्लॉट नं. 4, बिल्डिंग क्र. 3, उदयसिंगनगर, महावीर महाविद्यालयाजवळ) हा खेळाडू आपली MH-09 BN-9173 या हिरो प्लेझर मोपेडवरून घराच्या दिशेने निघाला होता. या वेळी चौकात कारने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत वरुणची मोपेड सुमारे पंधरा ते वीस फूट उंच हवेत उडून पडली आणि वरूण रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी त्याच्या डोक्यावर चारचाकीचे चाक गेल्याने कवटी फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला.

    ही धडक इतकी जोरात होती की या नंतर मद्यपी कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी विरुद्ध दिशेने येत असलेल्या दोन चारचाकी व पाच दुचाकींना चिरडत जात चारचाकी दोन वेळा पलटी होऊन पुन्हा सरळ होत पडली. हा सर्व प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. यामध्ये सात वाहनांना धडक दिल्याने रस्त्यावर रक्त आणि काचांचा सडा पडला होता. तर या अपघाताने कोल्हापूर शहर हादरून गेलं.

    वडील गेले न् माझी चूक झाली, माफ करा… ठाण्यातीलच शिंदे समर्थक माजी आमदाराची शरद पवारांना साथ

    जमावाचा मद्यपी चालकास बेदम चोप

    हा अपघात इतका भीषण होता की अपघात घडल्यानंतर काय झालं हे कोणालाच समजत नव्हतं. संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा आणि चक्काचूर झालेल्या गाड्यांच्या काचा पडलेल्या होत्या. अपघात घडताच नागरिकांनी येथे गर्दी केली आणि मद्यधुंज अवस्थेत असलेल्या ऋषिकेश बाबुराव कोतेकर याला गाडीतून बाहेर काढून बेदम चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने, जखमी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करत जखमींना तत्काळ सीपीआर रूग्णालयात हलवले. तर मृत वरूणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रूग्णालयात पाठवला.

    Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या पिंपरीच्या PSI चं निलंबन, कारवाईचं कारण काय?

    रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल प्रक्रिया

    अपघात स्थळावर चक्काचूर झालेल्या तीन चारचाकी आणि पाच दुचाकी पडलेल्या होत्या. घटनास्थळावरील चित्र मन सुन्न करणारं होतं. या अपघातात आपले कोणी नाही ना हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वरूणची चक्काचूर झालेली मोपेड पाहून त्याचे मित्र सीपीआरमध्ये आले आणि यानंतर घटनेची माहिती घरच्यांना मिळताच आई-वडील आणि नातेवाईक सीपीआर रूग्णालयात आले. सीपीआर रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या अपघात प्रकरणी मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत असलेला चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    ‘समृद्धी’वर थरार! बस १२० च्या स्पीडने अन् चालक सिनेमा बघण्यात मग्न

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed