• Sat. Sep 21st, 2024

सप्टेंबरअखेरच्या पावसाची कमाल, पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यातच टँकर

सप्टेंबरअखेरच्या पावसाची कमाल, पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यातच टँकर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यात सप्टेंबरअखेर पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरू शकली नाहीत. मात्र, जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पुणे जिल्ह्यातील केवळ पुरंदर तालुक्यात १२ टँकर सुरू आहेत. अन्य भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत. पुणे विभागात आजमितीला ११४ टँकर सध्या सुरू आहेत.

पावसाने यंदा दर वर्षीच्या तुलनेत चांगलीच पाठ फिरविली आहे. जूननंतर केवळ जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जुलैनंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने टँकरची संख्या वाढली होती. त्या वेळी पाण्याची चिंता निर्माण झाली होती. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विभागात सप्टेंबरमध्ये सुमारे दोनशेपर्यंत टँकर सुरू करण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर अखेरीस पावसाने चांगली बॅटिंग केल्याने पुणे जिल्ह्यासह विभागातील दोनशेपर्यंत पोहोचलेली टँकरची संख्या ११४पर्यंत खाली आली आहे.

पुणे जिल्ह्यात जूनपासून भोर, बारामती, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर, खेड या सहा तालुक्यांमधून टँकर सुरू होते. मात्र, सप्टेंबरच्या पावसामुळे परिस्थिती बदलली आणि पुरंदर तालुका वगळता अन्य पाच तालुक्यातील टँकर बंद करण्यात आले. परिणामी, जिल्ह्यात आजमितीला एकट्या पुरंदर तालुक्यात १२ टँकर सुरू आहेत, तर १२ टँकरने पुरंदर तालुक्यातील १० गावे आणि ६१ वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed