• Sat. Sep 21st, 2024
…तर पंतप्रधान मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील: चंद्रकांत पाटील

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी ‘यूनो’ संघटना निर्माण करतील. मोदी यांनी कोव्हिड काळात ६० देशांना मदत करून लस आणि अन्नधान्य पुरवले आहे. हे ६० देश मोदींच्या नेतृत्वात नव्या ‘यूनो’ संघटनेचे सदस्य होण्यासाठी तयार असतील,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. डीईएस पुणे विद्यापीठाच्या शुभारभप्रसंगी पाटील बोलत होते.

‘आपल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात तीन हजार वर्षे पुराणाची आहेत. मात्र, पुराण झाले की नाही, याबाबतीत आपली शंका असते. राम होते की नाही, याबाबतही आपली एक श्रद्धा असते. मात्र, राम आमचा मूळपुरुष आहे, असा विश्वास असतो. तरीही त्याबाबतीत आपण राम होते की नाही, असे म्हणतो,’ असे वक्तव्य पाटील यांनी या वेळी केले.

भारतात महिला आरक्षण पूर्वीपासून: चंद्रकांत पाटील

‘महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला. मात्र, हे आरक्षण भारतीय परंपरेमध्ये होतेच. मात्र, १२०० सालामध्ये मुस्लिमांनी आक्रमण केल्यानंतर, त्यांनी देशातील मंदिरे आणि महिलांवर लक्ष केंद्रित करून आघात केले. त्या वेळी हिंदूंनी आपल्या महिलांना वाचविण्यासाठी तिला दार बंद करून, शेवटच्या खोलीत लपवले. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला भरपूर शिकवायचे आहे, वैमानिक बनवायचे आहे, चंद्रावर पाठवायचे आहे. मात्र, हे सर्व करायला थोडा उशीर झाला, हे आपल्याला सांगावे लागेल,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘भारतीय बनावटीच्या जहाजातून इंग्रज आले’

आज जग ज्या वस्तू वापरते ते आपल्याकडे आधीच होते याची शास्त्रीय पद्धतीने माहिती देण्यात येणार आहे. ‘शून्य साली’ भारताचा व्यापार ३२ टक्के होता. ब्रिटिशांनी देश लुटून नेला तेव्हा तो तीन टक्के झाला. इंग्रज भारतात आले ते जहाज भारतीय बनावटीचे होते. या सगळ्याचा अभ्यास सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘येणाऱ्या काळात जग गीग अर्थव्यवस्थेवर चालेल’

येणाऱ्या काळात जग ‘गीग’ अर्थव्यवस्थेवर चालणार आहे. त्यामध्ये कायमस्वरुपी नोकरी नसेल, कंत्राटी पद्धतीने रोजगार असेल. कौशल्यांतील बदल आणि आणखी उच्च कौशल्ये शिकण्यासाठी पुढील काळात दर दहा वर्षांनी तरुण शिक्षणसंस्थाकडे वळणार आहेत. त्यासाठी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनी तयार असणे अपेक्षित आहे, असे मत या कार्यक्रमात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने काळा झेंडा दाखवत निषेध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed