पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण दोन हजार ८९ बस आहेत. त्यामध्ये ९९१ बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर, एक हजार ९८ बस या ठेकेदारांच्या आहेत. यातील ६४० बस या सीएनजीवरील आहेत. तर, ४५८ ई-बस आहेत. २५ ऑगस्टला ई-बसवरील काही चालकांनी आचानक संप पुकारला होता. त्यावेळी पीएमपी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.
पीएमपीच्या ई-बसमधील नवीन तंत्रज्ञानामुळे त्या बस चालविण्यास अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पीएमपीच्या चालकांना ई-बसचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात साडेचारशे चालकांनी ई-बसचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे आता भविष्यात ई-बस चालकांनी संप केला तरी पीएमपीच्या चालकाकडून बस संचलनात सुरूच राहतील आणि प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
आता ई-बस दुरूस्तीचेही प्रशिक्षण:
ई-बस दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. बसची काहीही समस्या आल्यावर थेट कंपनीच्या अभियंत्यांना बोलवावे लागते. अशा परिस्थितीत पीएमपीकडील गॅरेजमधील कर्मचाऱ्यांना ई-बसची दुरुस्ती करता यावी यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ई-बसच्या चालकांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत साडेचारशे बस चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इतरही चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
डॉ. सचिंद्र प्रताप सिंह
अध्यक्ष, पीएमपी
Read Latest Pune News And Marathi News