डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या शुभारंभप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती, कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, पाच हजार वर्षांच्या इतिहासात ० ते २०२३ या कालावधीचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्यानुसार ० सालामध्ये भारताचा व्यापार जगाच्या व्यापारामध्ये ३२ टक्के होता. त्यानंतर आक्रमणे सुरू झाल्यानंतर, हा व्यापार ८०० सालामध्ये चार टक्क्यांनी कमी होऊन २८ टक्क्यांवर आला.इंग्रज जातांना हा व्यापार ३ टक्क्यांवर आला. त्यांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे आपण किती प्रगत होतो, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आपण प्रगत होतो म्हणून आक्रमणे झाली. ब्रिटिश भारतात व्यापार होता म्हणून आले. ब्रिटिश भारतात येताना भारतीय बनावटीच्या जहाजाने आले आणि हे जहाज पुढे ८७ वर्षे टिकले. हा इतिहास या सर्वाचे आता संशोधन सुरू असून, हा सर्व इतिहास आपली परंपरा म्हणून आपल्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी आम्ही कॉलेजांना देणार आहोत. याचा अभ्यासात समावेश होणार आहे. ही माहिती खोटी नाही किंवा दंतकथा नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात इसवी सनाचा उल्लेख करून कोणी आपल्यावर आक्रमणे केली, कोणी मंदिरांवर लक्ष केंद्रित केलं, कोणी महिलांवर लक्ष केंद्रित केलं, ब्रिटिशांनी शिक्षण आणलं आदींची माहिती येईल. अशा अनेक बाबी आपल्याला माहितीच नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला. मात्र, हे महिलांचे आरक्षण भारतीय परंपरेमध्ये होते. मात्र, १२०० सालामध्ये मुस्लिमांनी आक्रमण केल्यानंतर, त्यांनी देशातील मंदिरे आणि महिलांवर लक्ष केंद्रित करून, आघात केले. त्यावेळी हिंदूंनी आपल्या महिलांना वाचविण्यासाठी तिला दार बंद करून, शेवटच्या खोलीत लपवले. मात्र, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला भरपूर शिकवायचे आहे, वैमानिक बनवायचे आहे, चंद्रावर पाठवायचे आहे. मात्र, हे सर्व करायला थोडा उशीर झाला, हे आपल्याला सांगावे लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान व्हावे, ही भारताची गरज आहे. प्रगत राष्ट्रांनी भारताला यूनोचे सदस्यत्व दिले नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी यूनो संघटना निर्माण करतील. मोदी यांनी कोव्हिड काळात ६० देशांना मदत करीत, त्यांना वॅक्सिन दिली. हे ६० देश मोदींच्या नेतृत्वात नव्या यूनो संघटनेचे सदस्य होण्यासाठी तयार होतील, असे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News