• Sat. Sep 21st, 2024
मोठी बातमी: समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात, १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २३ गंभीर

छत्रपती संभाजीनगर: बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे. तसंच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं होतं. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली.

Israel-Hamas War: हमासचा हवाई दल प्रमुख अबू मुराद हल्ल्यात ठार; इस्रायलच्या हवाई दलाची माहिती

हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षाचा चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतकार्य सुरू केलं असून घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची गांभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आलं असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed