राहुल आंग्रे यांच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनी देखील हॉटेलची तोडफोड करत धांगडधिंगा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एपीएमसी पोलिसांनी तीन वेळा उत्पादन शुल्क विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिकेस पत्र लिहून सेवन्थ स्काय हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पहाटेपर्यंत चालणाऱ्या अशा पबमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पाल्म बिच गॅलेरिया, सेक्टर १९ ए. एपीएमसी, वाशी येथील सेव्हन्थ स्काय हॉटेलचे पार्टनर सुनिल बालाजी भानुशाली याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसह अनेक जण जमलेले होते. फिर्यादी निकुंज सावला ओळखीचे आणि हॉटेलवर नेहमी येणारे राहुल आंग्रे, सूरज ढोणे हे त्यांचे इतर मित्रांसह पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर आले. त्यावेळी त्यास हॉटेल बंद झाले असल्याचे सांगितल्यावर त्याने आमचे पार्टनर सुनिल भानुशाली याचा वाढदिवस साजरा करायचा आहे असे कारण सांगून हॉटेलमध्ये मित्रांसह प्रवेश केला.
हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने दारूची मागणी केली असता ती देण्यास नकार दिला. या कारणावरून त्याने चिडून वाईट शिवीगाळ केली. त्याला समजावत असताना त्याने, सुरज ढोणे व त्यांचे इतर साथीदार यांनी हॉटेलमधील टेबल व खुर्च्या उचलून जमिनीवर टाकून तोडफोड केली. यावेळी मी ऐरोली येथील मोठा गुंड आहे. मी तिथला भाई आहे, तुला माहित नाही का, तुला जास्त माज आहे. आम्ही एनसीपीवाले आहे. आम्हाला सर्व हॉटेलवाले पैसे देतात. तसे तुम्हीपण हॉटेल चालवायचे असेल तर आम्हाला खंडणी द्यायची” असे म्हणून सोबत आणलेली पिस्तुल माझ्या डोक्याला लावली. तसेच तू खंडणी नाही दिली तर तुला जीवे मारू, अशी धमकी दिली.
त्यानंतर त्यांना समजावून हॉटेलच्या बाहेर काढत असताना त्याने परत माझ्या डोक्याला पिस्तुल लावले “मी मोठा भाई आहे. मला घाबरुन सगळे खंडणी देतात तशीच तु पण मला खंडणी द्यायची, असे म्हणुन राहुल आंग्रे, सुरज ढोणे व त्यांच्या मित्रांनी आम्हाला धक्का बुक्की केली, असे फिर्यादीने सांगितले. हॉटेलच्या काऊंटरवर हॉटेलमधीलच खुर्च्या व टेबल टाकून काऊंटर फोडून नुकसान केले. त्याबद्दल राहुल आंग्रे आणि सुरज ढोणे व त्यांच्या मित्रांविरोधात कायदेशीर तक्रार सावला यांनी केली असून यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.