• Sat. Sep 21st, 2024

सन २०१५नंतर समुद्री तस्करीत मोठी वाढ, NCB उपमहासंचालकांची माहिती

सन २०१५नंतर समुद्री तस्करीत मोठी वाढ, NCB उपमहासंचालकांची माहिती

मुंबई : सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध राजस्थान, पंजाबमध्ये कडक पावले उचलण्यात आली आहेत. प्रसंगी ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात आहे. रस्तेमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या सीमा बंद झाल्याने सन २०१५नंतर समुद्री अंमली पदार्थ तस्करीत मोठी वाढ झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) उपमहासंचालक (नैऋत्य व दक्षिण प्रदेश) एस. के. सिंह यांनी शुक्रवार मुंबईत पत्रकारांना दिली.

नैऋत्य प्रदेश महासंचालनालयाचा भाग असलेल्या एनसीबीच्या मुंबई क्षेत्रीय संचालक कार्यालयाने अलीकडेच तीन मोठ्या कारवायांत ८० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती केली. तसेच अंमली पदार्थ तयार करणाऱ्या दोन मोठ्या प्रयोगशाळा उद्ध्वस्त केल्या. त्यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना एस. के. सिंह यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात समुद्री नार्को तस्करीवर प्रकाश टाकला. नौदलाने अलीकडेच एनसीबीकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्याआधारे समुद्रात महत्त्वाच्या कारवाया केल्या, याबाबत विचारले असता सिंह म्हणाले, ‘अंमली पदार्थ तपासासंबंधीच्या सर्व संस्था कायम समन्वय ठेवून असतो. समुद्रातील तस्करी वाढली आहे. समुद्रात आम्ही कारवाई करू शकत नाही. त्यामुळेच नौदलाला याबाबत माहिती दिली जाते. त्यातूनच तीन मोठ्या कारवाया अलीकडच्या काळात करण्यात आल्या आहेत.’

पहिली कारवाई

मुंबई परिसरात तीन मोठ्या कारवाया एनसीबीने क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांच्या नेतृत्वात केल्या. पहिल्या कारवाईत खारघर येथे पॉल आयकेना या ६०वर्षीय नायजेरियन दलालाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्याआधारे छापा टाकला असता १.९५९ किलो कोकेनचा साठा सापडला. अधिक माहिती घेतली असता हा साठा सुरत येथील साकिर व सुफियान यांना दिला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांनाही अटक करण्यात आली. त्याचवेळी पॉल आयकेना हा मिरा रोड येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्या खोलीच्या मालकाचाही या तस्करीत सहभाग असल्याने त्याला अटक करण्यात आली. तसेच अंमली पदार्थ तस्करीचा पैसा मनी लाँड्रिग पद्धतीने व्यवहारात आणण्यासाठी एका बँकेतील व्यवस्थापकाचा सहभाग होता. त्या मोठ्या व्यावसायिक बँकेच्या अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. पॉलला या प्रकरणात याआधीही १९८९, २००१ व जानेवारी २०२३मध्ये अटक झाली होती.

दुसरी कारवाई

दुसऱ्या प्रकरणात बोलिव्हियाच्या साओ पावलो येथून दुबईमार्गे एतिहाद एअरलाइन्सने आलेल्या एवलिना अल्वारेझ व ग्लोरिया इओर्का या दोघींना अटक करण्यात आली. या दोघीही खेतवाडी येथील हॉटेलमधून हा व्यवसाय करणार असल्याची गुप्त माहिती होती. त्याआधारे एनसीबीने छापा टाकला असता त्यांच्याकडून एकूण ५ किलो कोकेन जप्त करण्यात आले.
सुसंस्कृत पुणे तस्करीचे केंद्र; दहा महिन्यांत १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, राजकीय वरदहस्त कोणाचा?
तिसरी कारवाई

तिसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ गुप्त माहितीच्याआधारे छापा टाकला असता तेथील दोन प्रयोगशाळेत अल्प्राझोलम हे अंमली पदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून आले. त्याचा १९९.३० किलोचा साठा जप्त करण्यात आले. हे अंमली पदार्थ महाराष्ट्रासह तेलंगण व आंध्र प्रदेशात ताडीमध्ये मिसळून सेवनासाठी पाठवले जाणार होते. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed