• Sat. Sep 21st, 2024

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी निर्मितीच्या कामांना गती देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ByMH LIVE NEWS

Oct 13, 2023
लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी निर्मितीच्या कामांना गती देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

  • उद्योगांना पायाभूत सुविधा निर्मिती, विमानतळ विकासाला प्राधान्य

  • लातूर एमआयडीसी पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणार

लातूर, दि. 13 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यात नवीन एमआयडीसीबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या एमआयडीसी निर्मितीला गती देण्यात येणार असून नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, माजी आमदार गोविंद केंद्रे यावेळी उपस्थित होते.

लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा-2 सोबतच उदगीर, चाकूर  येथे एमआयडीसी उभारण्यात येणार असून जळकोट येथे मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. चाकूर एमआयडीसी निर्मितीसाठी 266 हेक्टरचा प्रस्ताव लवकरच उच्च स्तरीय समिती समोर मांडला जाणार आहे. लातूर येथे अतिरिक्त एमआयडीसी टप्पा- 2 साठी 482 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही गतीने करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री ना. सामंत यांनी दिली.

जिल्ह्यातील उद्योगांचा विकास होण्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य राहणार असून विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतिमान करण्यात येणार आहे. विमानतळासाठी 48 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून आतापर्यंत 38 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून आणखी 10 हेक्टर भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लातूर एमआयडीसीमधील उद्योगांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाल्यामुळे अनेकदा जलगळती होते. त्यामुळे मांजरा धरण ते एमआयडीसी दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत निधी देण्यात येईल, असे ना. सामंत यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील एमआयडीसीमधील कामांसाठी 43 कोटी रुपये मंजूर

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 43 कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यामध्ये लातूर अतिरिक्त एमआयडीसीमधील विविध विकास कामे, औसा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे बळकटीकरण, अहमदपूर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे बळकटीकरण व पाणी पुरवठाविषयक कामांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा

बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेतून जिल्ह्यात 760 उद्योग उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या योजनेमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदारांमधील 18 घटकांसाठी विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

उद्योगमंत्र्यांनी जाणून घेतल्या उद्योजकांच्या समस्या

लातूर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे लातूर येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांनी केलेल्या वीज, पाणी, पायाभूत सुविधाविषयक मुद्दे मांडले. या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करून उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed