ठाणे ते बोरिवलीदरम्यान संपूर्ण घोडबंदर रस्त्याला वळसा घालून दीड ते दोन तासांचा प्रवास टाळण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची टेकडी खणून तेथून बोगदा तयार करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. बृहत प्रकल्प आराखड्यानुसार या प्रकल्पाचा खर्च जवळपास १३ हजार कोटी रुपये निश्चित होता. मात्र नियोजनानंतर सुमारे चार वर्षे हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. मागीलवर्षी प्रकल्प उभारणीसाठी निविदा काढण्यात आली. निवीदा प्रक्रिया सुरू असतानाच एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा बांधकाम खर्च १५ हजार २६४ कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. प्रत्यक्षात बांधकामाचे कंत्राट १४ हजार ४०१ कोटी रुपयांना यावर्षी जून महिन्यात देण्यात आले. परंतु आता वन विभागासंबंधीच्या लालफितीशाहीमुळे अद्यापही या बोगदामार्गाचे काम सुरू झालेले नाही.
हा बोगदा ठाणे ते बोरिवलीदरम्यान ५.७४ किमी व बोरिवली ते ठाण्यादरम्यान ६.०९ किमी लांबीचा आहे. दोन्हीकडील जोडरस्ता १.५५ किमीचा असेल. जवळपास १० किमीचा मार्ग अभयारण्याच्या २५ मीटर खालून जाणार आहे. त्यासाठीच्या परवानगीचा प्रस्ताव एमएमआरडीएने मे, २०२३ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दिला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात केंद्राकडे पाठवला. आता केंद्राची मंजुरी येईपर्यंत पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कंत्राटदाराकडून यंत्रसामग्रीची जुळवाजुळव
या बोगदा बांधकामाचे कंत्राट मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला जून, २०२३मध्ये देण्यात आले. त्यानंतर कंत्राटदाराने बोगदा खणण्यासाठी यंत्रसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन येथून दोन मोठे टीबीएम (टनेल बोरिंग यंत्र) मागविण्यात आले आहे. तसेच टीबीएम डोंगरावरून खाली सोडण्यासाठी आवश्यक असलेली सामग्रीदेखील सज्ज केली आहे. बोरिवली बाजूने वन भाग नसलेल्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू झाले आहे. तेथेच काँक्रीट मिश्रणाचा प्रकल्पदेखील उभा करण्यात आला आहे.
प्रकल्प असा
ठाणे-बोरिवली : ५.७४ किमी
बोरिवली-ठाणे : ६.०९ किमी
दोन्हीकडे जोडरस्ता : १.५५ किमी
ठाणे-बोरिवली खर्च : ७४६४ कोटी रु. (मेघा इंजिनीअरिंगची बोली)
बोरिवली-ठाणे खर्च : ६९३७ कोटी रु. (मेघा इंजिनीअरिंगची बोली)
भूसंपादन खर्च : ७०० कोटी रु.
आकस्मिक खर्च : ३७५.४० कोटी रु.
अन्य सेवा : २६१ कोटी रु.
एकूण खर्च : १५ हजार ७३७ कोटी रु.
वाहनांना लाभ : दररोज सरासरी दीड लाख
Read Latest Maharashtra News And Marathi News