• Tue. Nov 26th, 2024

    करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

    ByMH LIVE NEWS

    Oct 11, 2023
    करमणूक क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी मानक प्रणालीत सुधारणा करणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे

    मुंबई, दि. ११ :- चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्मात्यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांत त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल- अकुशल कामगार, कलावंत, तांत्रिक यांच्याकडून  प्राप्त झालेल्या तक्रारी विहीत अधिकारांचा अवलंब करून दोन महिन्यांत निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‘सीटा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

    वेब सिरीज, दूरचित्रवाणी मालिका क्षेत्रातील कलावंतांच्या अडचणींबाबत आज मंत्रालयातील परिषद सभागृहात सिने ॲण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री श्री. खाडे बोलत होते. यावेळी आमदार योगेश सागर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, अपर आयुक्त शिरीन लोखंडे, उपायुक्त भगवान आंधळे, संभाजी व्हनाळकर, सीटा संघटनेचे अध्यक्ष घनश्याम श्रीवास्तव,  संजय भाटिया, अयुब खान, रवी झंकार, टीना घई, दर्शन जरीवाला उपस्थित होते.

    चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील मालक, निर्माते यांची जबाबदारी आणि कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरता तयार करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी चित्रनगरीत एक समिती गठित करावी. चित्रपट व करमणूक क्षेत्रात कामगारांचा व इतर तांत्रिक बिगर तांत्रिक कामगारांचा पुरवठा करणारे कंत्राटदारांची नोंदणी कामगार विभागाकडे करण्यात यावी. तसेच मालिका, वेब सीरीज, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कामगार विभागाची परवानगी असेल तरच स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी.

    त्याचबरोबर महिला व बालकांची सुरक्षितता, वेतन आणि भत्ते इत्यादी बाबींचा त्यात अंतर्भाव करावा.  निर्माता कंपन्या सुद्धा कामगार कायद्याअंतर्गत येतील, यासाठी नियमात सुधारणा करण्याची ग्वाही कामगार मंत्री श्री. खाडे यांनी दिली.

    0000

    मनीषा सावळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed