• Sat. Sep 21st, 2024

३२ वर्षांच्या इनिंगला अजितदादांकडून पूर्णविराम, सहकारातील देशातील आघाडीच्या बँकेतून राजीनामा

३२ वर्षांच्या इनिंगला अजितदादांकडून पूर्णविराम, सहकारातील देशातील आघाडीच्या बँकेतून राजीनामा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणारा वेळ, उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यबाहुल्यामुळे बँकेच्या कामकाजात लक्ष देता येत नाही तसेच बैठकांना उपस्थित राहता येत नसल्याचे कारण दिल्याने बँकेच्या संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

अजितदादा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर १९९१ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे ३२ वर्ष त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. चारवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या अजित पवार यांना एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याची संधी मिळाली. ही संधी मिळाल्याने अजित पवार यांचा गट बाहेर पडून सत्तेत सहभागी झाला. मात्र, तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत.

अजितदादा पुण्याचे कारभारी झाल्याने विकासाला गती मिळणार, ‘डीपीसी’च्या निधी वाटपाचा तिढा सुटणार?
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी संचालक मंडळाच्या प्रचारार्थ पुण्यात झालेल्या सभेवेळी अजितदादांनी, ‘आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. दिलीप वळसे पाटील, दत्तामामा भरणे यांच्यासह संचालक मंडळाच्या आग्रहाखातर आपण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत,’ असे जाहीरपणे सांगितले होते. बँकेच्या तीन बैठकांना उपस्थित राहणे हे संचालकांवर बंधनकारक आहे. ‘राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादीचे पक्ष संघटनासाठी वेळ द्यावा लागत आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभाराचा व्याप अजितदादांवर वाढला आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक बैठकींना अजितदादांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. बँकेच्या गेल्या बैठकीला ते अनुपस्थित होते. तसेच दादांच्या वेळेनुसार, बँकेच्या बैठकांची वेळ ठरविणे प्रत्येक वेळी शक्य नाही. काही निर्णय़ त्या त्या वेळी घेणे गरजेचे असल्याने दादांच्या वेळेनुसार बैठक घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे अजितदादांनी बँकेचा राजीनामा दिला आहे,’ असे संचालकांनी सांगितले.

१९९१ साली बँकेचा व्यवसाय हा ५५८ कोटी रुपयांचा होता. तो आता २० हजार ७१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली बँकेने विविध योजना राबविल्या. एटीएम, गुगल पे सुविधा, शेड्युल बँकेचा दर्जा तसेच देशातील आघाडीची बँक म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, दादांच्या ७ मंत्र्यांना जबाबदारी, ३ जिल्ह्यांचा तिढा कायम
राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि पक्ष संघटनाचा व्याप अजितदादांवर वाढला आहे. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राजीनामा दिला आहे. बँकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. बँकेला आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याची अजितदादांनी ग्वाही दिली आहे- डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed