• Sat. Sep 21st, 2024
लातूरच्या काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल, ते नेमकं प्रकरण काय?

लातूर : देशपातळीवर चर्चेत आलेल्या लातूरमधील युवक काँग्रेस महिला पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल लागलाय. यातदोन मारेकऱ्यांना अजन्म कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड तर उर्वरित चार सहआरोपींना तीन वर्षाचा सश्रम कारावास तर ३ हजार रुपये दंडाची शिक्षा लातूर जिल्हा न्यायाधीशांनी सुनावली. महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर अशी अजन्म कारावासाची शिक्षा मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रभाकर शेट्टी, सुवर्णंसिंह ठाकूर, विक्रम सिंह चौहान, कुलदीप ठाकूर अशी सश्रम कारावासाची शिक्षा मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या कोर्टाने हा निकाल दिलाय.

हत्याकांडातील महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोन मुख्य आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आलीये. कलम ३०२,३४ २०१ २०३, १२० ब कलमांखाली विक्रमसिंह चौहाण, प्रभाकर शेट्टी, सुवर्णसिंह ठाकूर, कुलदीप सिंह ठाकुर यांना हत्येच्या कटातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षाची सजा सुनावण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हत्या झालेल्या पदाधिकारी लातूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. अगदी महाविद्यालयीन जीवनातच त्या सामाजिक कामात सक्रीय झाल्या होत्या. २०१२ साली झालेल्या लातूर महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली होती. पण त्यावेळी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली नव्हती. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. वकिलीचा व्यवसाय सुरु करण्याआधी त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचदरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली राजकीय इनिंग सुरू केली होती.

नव्या कोऱ्या संसारात पैशांचं विघ्न, गर्भवती बायकोला नवऱ्याने झोपेतचं संपवलं; माय-बाप धाय मोकलून रडले
अल्पावधीतच त्यांना राजकारणात ओळख मिळाली. लातूरच्या राजकारणात त्यांची चर्चा होऊ लागली. पक्षातील अनेक बडे नेते त्यांना फोन करू लागले, त्यांच्याशी संपर्क ठेवू लागले. हीच बाब स्थानिक पदाधिकाऱ्यांना खटकत होती. शिवाय त्यांनी निवडणूक लढवू नयेत, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आडकाठी आणल्याची देखील चर्चा झाली.

विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांचा २१ मार्चला वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. २०१४ ला वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमासाठी त्या आपल्या घरून स्कुटीवरून निघाल्या. पण त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबीय-नातेवाईकांनी दोन दिवसानंतर मिसिंगची तक्रार पोलिसांकडे दिली. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह तुळजापूर पोलिसांना एका तलावाजवळ आढळून आला. अखेर पोलिसांनी २८ मार्चला महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यापैकी महेंद्रसिंह हे लातूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते तर समीर हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

‘१० वेळा भूकंपाचे धक्के, पण मापक यंत्रात दोन वेळाच नोंद; लातूरच्या हासोरी गावातील नागरिक धास्तावले!

घटनाक्रम कसा होता?

  • २१ मार्च २०१४ हा महिला काँग्रेस पदाधिकारी गायब झाल्या होत्या.
  • २४ मार्चला त्यांचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर नजीक पाचुंदा तलावात सापडला
  • २४ तारखेलाच रात्री उशिरा पीडितेच्या मृतदेह लातुरात आणण्यात आला व लगेचच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • २६ मार्च रोजी मृत त्यांच्या भावाने बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती.
  • २८ तारखेला संध्याकाळी पोलिसांनी कल्पना गिरी यांच्या हत्येप्रकरणी युवक कॉंग्रेसचाच अध्यक्ष महेंद्रसिंग चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली.
  • १३ एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी अटक केली.
  • १५ एप्रिल रोजी चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.
  • शेट्टीला ५ दिवसांची प्रथम पोलिस कोठडी सुनावल्यानंतर १४ दिवसांची न्यायालईन कोठडी सुनावण्यात आली होती.
  • नंतर काही दिवसांनी या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती.

कसं तापलं राजकीय वातावरण?

काँग्रेस पक्षाच्या सक्रीय महिला पदाधिकारी यांचा खून त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांनी केला होता. यामुळे पक्षांतर्गत राजकारण ,महिला पदाधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व या सर्व बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालिन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी यावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे प्रकरण देशपातळीवर पोहोचलं.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed