जीएमएलआर प्रकल्पासाठी विविध करांसह १२ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. या कामासाठी जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड अॅण्ड नागार्जुन कन्स्ट्रक्शन ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गापासून खिंडीपाडा जंक्शन अमरनगर, मुलुंड आणि पश्चिम द्रुतगती मार्गापासून चित्रनगरी, गोरेगावदरम्यानच्या या प्रकल्पांतर्गत रस्त्याची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. चित्रनगरी ते खिंडीपाडा जंक्शन या टप्प्यादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग असून तेथून भूमिगत बोगद्याची कामे केली जाणार आहेत. आरेच्या जंगलातून हा बोगदा जात असल्याने कास्टिंग यार्ड हे २५ किमी लांब निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या विविध करांसह १३२ कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. या प्रस्तावाला पालिका प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
वन्यजीवनाला बाधा नाही
प्रस्तावित दोन्ही बोगदे प्रत्येकी ४.७० किमीचे असून अभयारण्य परिसरात त्याचा अंतर्गत व्यास १३ मीटरचा असेल. बोगद्यांमुळे अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदेला कोणतीही बाधा पोहोचणार नाही. कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. बोगद्यांमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी वायूविजन यंत्रणा, आग प्रतिबंधात्मक यंत्रणा, तसेच पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि इतर संस्थांच्या वाहिन्या विकसित करण्यात येणार आहेत. बोगद्याचे काम यंदाच्या ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ते पाच वर्षे चालणार आहे.