अहमदनगरपासून ६५ किलोमीटर अंतरावर अवनी नदीच्या काठावर शेवगाव तालुक्यात,आव्हाणे बुद्रुक हे गाव आहे. निद्रिस्त गणपतीचे गाव अशीच या गावाची ओळख आहे. अष्टविनायकांपैकी मोरगावच्या श्रीगणेशाचे स्वयंभू व सर्वधर्मीय यांचे जागृत व वैशिष्ट्य पूर्ण असे देवस्थान आहे. दगडी बांधकाम त्यावर देवदेवतांच्या मूर्तींचे नक्षीकाम असलेले मंदिराचे शिखर. मंदिरात चार फूट लांब, तीन फूट रुंद व दोन फूट खोलीच्या हौदात दक्षिणेकडे मस्तक करून झोपलेल्या स्थितीत गणेशाची मूर्ती आहे. मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल आहे. तिची लांबी सव्वातीन फूट तर रुंदी दोन फूट आहे. हा पूर्वाभिमुख गणेश उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले.दर चतुर्थीला व गणेशोत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी होत असते. असंख्य भाविक येथे याकाळात दूरवरून येत असतात. या मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी येथे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे.
अशी आहे अख्यायिका
आव्हाणे गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहात होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टांत झाला “आता त्यांनी वारी करू नये”. तरीसुद्धा दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही. एकदा ते वारीला निघाले. वाटेत ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर ते लांब वाहत गेले. वाटेत आलेल्या एका बेटावर ते थांबले. तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला, “मीच तुझ्या गावी येतो”. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याला जमिनीत एक स्वयंभू गणेशमूर्ती मिळाली. ती मूर्ती म्हणजेच निद्रिस्त गणेश होय. गावात ही वार्ता करणोपकरणी जाताच सगळा गाव तिथे जमा झाला. त्यानंतर ही मूर्ती वर काढण्याचा प्रयत्न झाला, पण मूर्ती जागची हलेना. गावकऱ्यांनी तशाच स्थितित तिथेच मंदिर बांधले. अशी या मूर्तीची कथा सांगितले जाते. या मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण भाविकांना अजूनही दिसते.
(माहिती संकलन : अपूर्वा अनिल गर्जे)