महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी समिती स्थापन केली आहे,त्या समितीने आतापर्यंत काय कार्य केले हे समाजाला सांगणे आवश्यक आहे.आपण त्याचा कुठे हैदराबादला दौरा केलाय, त्याबाबतची माहिती आवश्यक आहे. जी समिती गठीत झाली त्या समितीने पहिली बैठक अंबड किंवा संभाजी नगरला घ्यावी, अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन द्वारे मागणी केली आहे. या समितीने दस्तावेज जमा केलेत का, त्यात अभ्यासक आहेत का? कारण त्याकाळी शाईने लिहिलेले दस्तावेज होते.समितीत मोडी लिपीचे कुणी अभ्यासक आहेत का ? समिती रिकाम्या हाताने परत आली असे, आम्हाला माध्यमातून कळले आहे. पण ते परत कसे येऊ शकतात कारण सर्व माहिती तर तेथेच आहे, असे जरांगे म्हणाले.
या समितीत उर्दू वाचणारा कुणी अभ्यासक आहे का? समितीत जे कुणी सदस्य गेले ते अभ्यासक आहेत का? कारण त्यात फारसीत लिहिलेले आहे, ते वाचणार कुणी होत का? असही जरांगे म्हणाले. तुम्ही जर त्याचा गूगलच्या माध्यमातून भाषांतर करणार असाल तर ते शक्य नाही. कारण त्याला प्रिंटेड लागते तरच भाषांतर होते, अशी शंका मनोज यांनी बोलून दाखवली.
तुम्ही जर भाषांतर केलं असेल तर आमचा त्यावर आरोप किंवा आक्षेपही नाही, पण आमचा गैरसमज दूर करावा अशी अपेक्षा मनोज यांनी व्यक्त केली. सरकारला गरज असेल तर आमच्याकडेही मोडी,उर्दू, फारसीचे अभ्यासक आहेत त्यांना मदतीला घ्या असेही जरांगे म्हणाले. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिलेत, आम्हाला बाकी भानगडीत पडायचे नाही. ४० दिवसांपर्यंत आम्ही सरकारला अडकाठी करणार नाही, पण ४०व्या दिवशी सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, असा खंबीर विश्वास मनोज यांनी व्यक्त केला.