सन २०२७-२८मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठीची तयारी पालिका स्तरावरून सुरू झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशांनुसार महापालिकेने प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना निर्देश दिले असून, प्रारूप प्रस्ताव सिंहस्थ आराखडा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना सादर करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करून अंतिम आराखड्यासाठी सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सिंहस्थ काळात येणारे साधू-महंत व कोट्यवधी भाविकांना मुलभूत सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. त्यादृष्टीने बांधकाम विभागाला महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य-वैद्यकीय, मलनिस्सारण विभागाप्रमाणेच बांधकाम विभागाने आपला प्रारूप प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. या प्रस्तावानुसार शहरात २१ ठिकाणी २८५ कोटींचे पूल उभारण्यात येणार आहेत. याअंतर्गत अस्तित्वातील पुलांचे रुंदीकरण, तर काही ठिकाणी नवीन पूल उभारले जाणार आहेत.
…येथे उभारले जाणार पूल
गोदावरी नदीवर दसकगाव, तपोवन एसटीपी, लक्ष्मीनारायण मंदिरालगत, टाळकुटेश्वर, गाडगे महाराज, रामसेतू पादचारी पूल, रामवाडी पूल, कुसुमाग्रज उद्यानालगत तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीलगत नवीन पूल उभारले जाणार आहेत. याशिवाय नंदिनी नदीवर पखालरोड, भारतनगर, चिल्ड्रन्स पार्क, मिलिंदनगर एक, मिलिंदनगर दोन, सिटीसेंटर मॉल, दोंदे पूल येथील अस्तित्वातील पुलांच्या ठिकाणी नवीन पूल उभारले जातील. वाघाडी-अरुणा नदीवर गुंजाळबाबा नगर, राजमाता, पोकार कॉलनी, म्हसरूळ गाव येथे, तर वालदेवी नदीवर वडनेर येथे पूल उभारला जाणार आहे.
सिंहस्थ आराखड्यात गोदावरी नदीवर नऊ ठिकाणी, वालदेवीवर एक, नंदिनीवर सात, वाघाडी-अरुणावर चार पूल प्रस्तावित करण्यात आले आहेत.
– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता