• Wed. Nov 27th, 2024

    समन्वय राखून प्रत्येक लाभार्थ्याला लाभ द्यावा – मंत्री अतुल सावे

    ByMH LIVE NEWS

    Sep 19, 2023
    समन्वय राखून प्रत्येक लाभार्थ्याला लाभ द्यावा – मंत्री अतुल सावे

    छत्रपती संभाजीनगर, दि.19 (जिमाका)- ‘एडीआयपी’अर्थात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3654 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य दिले जाणार आहे. दि. 7 व 8 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात व नंतर 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करुन साहित्याचे वाटप होणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची तपासणी करुन निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना लाभ पोहोचवावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखावा, असे निर्देश गृहनिर्माण व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल (दि.18) दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुदर्शन तुपे, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, तसेच गटविकास अधिकारी पी.व्ही.नाईक, खुलताबाद, उषा मोरे, पैठण, संजय गायकवाड,फुलंब्री, ए.एस. अहिरे,सोयगाव, सी. एम. ढोकणे,कन्नड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दिव्यांगांना सहाय्यभूत ठरणारे साहित्य व कृत्रिम अवयव देण्यासाठी 3654 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात शहरात 1060 लाभार्थी असून ग्रामिण भागात 2594 लाभार्थी आहेत.

    पैठण येथे 272, खुलताबाद येथे 181, कन्नड येथे 535, सोयगाव येथे 234, वैजापूर येथे 365,  सिल्लोड येथे 415, गंगापूर येथे 206, फुलंब्री येथे 129 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे सहसाहित्य व कृत्रिम अवयव देण्यासाठी  तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरात दि.7 व 8 ऑक्टोबर तर फुलंब्री येथे दि.28, कन्नड येथे दि.29, सिल्लोड दि.30, सोयगाव दि.31, गंगापूर येथे दि.1 नोव्हेंबर, वैजापूर येथे दि.2 नोव्हेंबर, खुलताबाद येथे दि.3 नोव्हेंबर व पैठण येथे दि.4 नोव्हेंबर या दिवशी शिबिरे आयोजित करावीत असे नियोजन करण्यात आले आहे.

    या नियोजनानुसार वाटप करण्यासाठी आणण्यात येणारे साहित्य हे सुरक्षित जागी ठेवणे, त्याची जोडणी करणे व प्रत्यक्ष तपासणी करुन दिव्यांगांना देणे,यासाठी नियोजन करावे. साहित्यांबाबत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवावी. ज्या लाभार्थ्यांना शिबिरस्थळी येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी  ग्रामपंचायतमार्फत घरपोच साहित्य देण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक लाभार्थ्याला साहित्य मिळेल यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करावे,असे निर्देश श्री.सावे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed