• Sat. Sep 21st, 2024

मुस्लिम बांधवांनी पुण्यात दिला ‘भाईचारा’चा संदेश, एक ऑक्टोबरला ईद ए मिलादनिमित्ताने मिरवणूक

मुस्लिम बांधवांनी पुण्यात दिला ‘भाईचारा’चा संदेश, एक ऑक्टोबरला ईद ए मिलादनिमित्ताने मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे हिंदू बांधवाच्या विघ्नहर्ता गणरायाचे विसर्जन आणि दुसरीकडे, इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांची जयंती ही येत्या २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत आहे. दोन्ही समाजाच्या वतीने शहरात दर वर्षी मिरवणुका काढण्यात येतात. मात्र, गणरायाच्या विसर्जनासाठी मुस्लिम समाजाने यंदाच्या वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस (मिरवणूक) पुढे ढकलून, हिंदू मुस्लिम ‘भाईचारा’चा संदेश दिला आहे. येत्या एक ऑक्टोबरला हा जुलूस काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दोन्ही मिरवणुका एकाच मार्गावर निघाल्यास अडचण निर्माण होऊ शकते. हिलाल सिरत कमिटीने ही बाब ओळखून, मुस्लिम समाजातील विविध धर्मगुरुंच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कमिटीचे हाफिज गुलाम, मौलाना निजामुद्दीन, रफिउद्दीन शेख, कारी इदरीस अन्सारी, नदीम मुजावर, सिराज बागवान आदींच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

सिरत कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख म्हणाले, ‘दर वर्षीप्रमाणे मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येते. येत्या २८ सप्टेंबरला ‘ईद ए मिलादुन्नबी’ हा सण येत आहे. त्याच दिवशी पुण्यातून गणरायाला निरोप देण्यासाठी प्रमुख मार्गांसह शहराच्या विविध भागांतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होईल. गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडावी आणि उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये, यासाठी २८ सप्टेंबरला ‘ईद ए मिलादुन्नबी’निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबरऐवजी आता एक ऑक्टोबरला शहराच्या प्रमुख मार्गावरून पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येईल. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन माहिती देण्यात आली आहे.’

शांती, प्रेमाचा संदेश देणारे महंमद पैगंबराच्या जयंतीनिमित्त येत्या एक ऑक्टोबरला मिरवणूक काढण्यात येणार आहे. पुण्यासह जिल्ह्यातील विविध शहरे, तालुक्यांतील मुस्लिम समाजानेही २८ सप्टेंबरऐवजी एक ऑक्टोबर किंवा अन्य दिवशी शांततेत मिरवणूक काढावी. या निर्णयाद्वारे पुण्यात हिंदू व मुस्लिम समाजात ‘भाईचारा’ निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे.

– रफिउद्दीन शेख, सरचिटणीस, हिलाल सिरत कमिटी

३२ वर्षांपूर्वी दोन्ही उत्सव एकाच दिवशी

पुण्यात ३२ वर्षांपूर्वी एकाच दिवशी गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंतीचा उत्सव आला होता. त्या वेळीदेखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांनीही संयम दाखवून, पैगंबर जयंतीनिमित्त घरात कुराण पठण आणि प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. आता ३२ वर्षांनंतर यंदा दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले असून, यंदा पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस एक ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed