• Tue. Nov 26th, 2024

    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना; कारागिरांच्या सक्षमीकरणाची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2023
    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना; कारागिरांच्या सक्षमीकरणाची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

    नाशिक, दिनांक : 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा):  भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’ चा शुभारंभ नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सर्व कारागिरांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने गावामधील शेवटच्या गरजू घटकांपर्यंत ही योजना पोहचविण्यात यावी, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.

    आज भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण कालिदास कलामंदिर येथे प्रक्षेपित करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार बोलत होत्या. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, एनएचएआय नाशिक चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, एनएचएआय नाशिक चे व्यवस्थापक डी. आर. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध व्यवसाय करणारे कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जिल्हावासियांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले. विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक योजना ही लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय व सहकार्यातून यशस्वी होत असते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य व प्रयत्न आवश्यक असल्याचे ही यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले.

    या योजनेच्या माध्यमातून 18 प्रकारचे विविध पारंपरिक व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच या योजने अंतर्गत 2027-28 पर्यंत देशातील साधारण 30 लाख कारागिरांना लाभ देण्यात येणार आहे. असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी सांगितले.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, 18 विविध प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना या योजनेच्या माध्यमातून 15 हजार रुपयांचे टूलकीट देण्यात येणार आहे. तसेच मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यांनतर लाभार्थ्यांना विनातरण कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा हस्त कौशल्याद्वारे विविध साधनांचा वापर करून स्वयंरोजगाराची निर्मीती करणारे कलाकार आणि कारागीर असणे गरजचे आहे असून लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

    या कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित आमदार देवयानी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, नाभिक असे विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed