प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा देशात शुभारंभ
केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजी नगर, दिनांक १७ (विमाका) : भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, बँकांकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते द्वारका (नवी दिल्ली) येथून झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये करण्यात आले. या योजनेच्या शुभारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, संजय केणेकर, शिरिष बोराळकर, संजय खंबायते, बापू घडमोडे आदींची उपस्थिती होती.
डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत सुतार, नौका कारागीर, अस्त्रकार, लोहार, हॅमर आणि टूल किट कारागीर, कुलुप कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, राजमिस्त्री, बास्केट, चटई, झाडू, कॉयर विणकर, बाहुली आणि खेळणी कारागीर, नाभिक, पुष्प कारागीर, धोबी, शिंपी, मत्स्य जाळे कारागीर या १८ व्यवसायांचा समावेश आहे. देशाच्या जडणघडणीत या कारागीरांचा समावेश होतो. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या पारंपरिक कलाकार आणि कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार यांसारख्या व्यवसायात गुंतलेले हे कारागीर आपली कौशल्ये व व्यवसाय पिढ्यानपिढ्या पुढे चालवतात. या कुटुंबांमध्ये आजही पारंपरिक गुरू-शिष्य पंरपरा अस्तित्त्वात आहेत. या पारंपरिक व्यवसायांना पीएम विश्वकर्मा योजनेतून अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मतही त्यांनी मांडले.
पीएम विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभधाकांना बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. देशाच्या जडणघडणीत पारंपरिक व्यावसायिक ‘विश्वकर्मा’ यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक व्यावसायिकांचा विकास झाल्यास देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. म्हणून बँकांनी देशाच्या विकासाची भूमिका लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. आमदार बागडे, केणेकर, श्रीमती रहाटकर यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमात ‘विश्वकर्मा’ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन सानिका निर्मळ यांनी केले.
दिल्लीतून योजनेचा शुभारंभ
विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी दिल्लीत पीएम विश्वकर्मा योजनेचा देशभरात शुभारंभ झाला. देशातील इतर ७० ठिकाणी विविध मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे यशोभूमी कन्वहेंशन सेंटरचे लोकार्पण केले. त्यासह पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रतिक चिन्ह, टॅगलाइन, ऑनलाइन पोर्टल, डाक तिकिटे, टूलकिट बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे प्रधानमंत्री मोदी यांनी दिली. पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री.मोदी यांनी भाषणातून केले.