• Tue. Nov 26th, 2024

    नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2023
    नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

    श्री तुळजाभवानी मंदिर विकासाचा 1328 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

    जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाउंट काढणार

    पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप होणार

    धाराशिव,दि.17(जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही  पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.

    मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या वर्धापन दिनानिमित्त आज 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितांना संबोधित करून शुभेच्छा देतांना ते बोलत होते.यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील,स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर,रामभाऊ  जाधव,कलावती उंबरे,जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, संतोष भोर,राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले,17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.रक्तदान व अवयवदान याबाबतीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल.या मोहिमेअंतर्गत 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य मेळावे व  सर्व गावांतून आयुष्मान ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत. सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाऊंट (“आभा” कार्ड) काढण्यात येतील. अंगणवाडी व शाळांमध्ये झिरो ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येईल.असे ते म्हणाले.

    अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही सहभागी करुन घेण्यात आल्याचे सांगून डॉ. सावंत म्हणाले,या कालावधीत शाळांमध्ये निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन,प्रभात फेरी आणि इतर शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनाबरोबरच मुक्ती संग्रामाविषयी पुस्तक प्रदर्शने, मान्यवरांचे व्याख्यान, आकाशवाणीवर मराठवाडा मुक्तीसंग्राम गाथा,75 हजार महिलांची आरोग्य तपासणी, 75 हजार वृक्ष लागवड,ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन,तुळजापूर येथील हुतात्म्यांना मानवंदना,वॉकेथॉन (वॉक फॉर नेशन),प्रभात फेरी, मराठवाड्याचे धारातीर्थ हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रत्येक गावात दिपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करुन नागरिकांना व नवयुवकांना या स्वातंत्र्य लढ्याबाबत अवगत करण्यात आल्याचे डॉ.सावंत यांनी यावेळी सांगितले.

    काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेण्यात आले आहे असे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासाठी 1 हजार 328 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.माणकेश्वर येथील महादेव मंदिर,तेर येथील संत गोरोबा काका मंदिर या मंदिरांच्या विकासासाठीही भरीव निधी मंजूर करण्यात आला. तसेच तुळजापूर तालुक्यात शेळीसमूह योजना राबविण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.असेही पालकमंत्री डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

    मुख्य शासकीय ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत आणि मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य प्राप्त झालेल्या शहिदांना जिल्हा पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

    पालकमंत्री डॉ.सावंत उपस्थितांना शुभेच्छा देण्यापूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रतिज्ञा दिली.

    पालकमंत्र्यांचे हस्ते स्वतंत्र्य सैनिक भास्कर सांभराव नायगांवकर, रामभाऊ रघुनाथ जाधव आणि कलावती वसंत उंबरे यांना स्वातंत्र्य सैनिकाची नेमप्लेट तसेच संजय नायगावकर व शीला पेंढारकर यांना ओळखपत्र वाटप केले. यावेळी पालकमंत्र्यांचे हस्ते विविध स्पर्धेचे पुरस्कार तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

    पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व इतर कुटुंबीयांची भेट घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed