• Sun. Sep 22nd, 2024

मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2023
मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासाच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झाली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.

स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबिय, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार यावेळी उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी सुमारे 59 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. लातूर-टेंभूर्णी मार्ग, लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी यासह विविध कामांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात लातूरकरांचे योगदान खूप महत्वाचे आहे. या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. महाराष्ट्र परिषदेची महत्वाची दोन अधिवेशने लातूरमध्ये झाली. या भागात आर्य समाजाचा अधिक प्रभाव होता. औराद, निलंगा, होडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी अशा अनेक ठिकाणी झालेल्या लढाईचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांच्या निजाम व रझाकार यांच्याशी झालेल्या लढायांचे स्मरण व्हावे, यासाठी अशा लढाईच्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येत आहेत. तसेच रामघाटच्या प्रसिद्ध लढाईचे चीरस्मरण म्हणून त्याठिकाणी भव्य प्रवेशद्वार उभे केले जाणार आहे. यासाठी नुकतेच शासनाने सुमारे 98 लक्ष रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमाला, माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे आणि प्राचार्य प्रा. सोमनाथ रोडे यांची मराठवाडा मुक्तिलढ्यावर प्रकट मुलाखत, ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आदी उपक्रमांतून मुक्तिसंग्रामाचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शस्त्र सलामी दिली. ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच उपस्थितांना मराठवाडा भूमीला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ना. बनसोडे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन उद्धव फड यांनी केले.

ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शन, चित्ररथाला भेट

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जागर माहितीपटाच्या माध्यमातून करण्यासाठी ‘क्रांतिशाली लातूर’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला आणि चित्ररथाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. तसेच या प्रदर्शनातील ग्रंथ, दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी केली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घेण्यासाठी या प्रदर्शनातील दुर्मिळ छायाचित्रे मौल्यवान ग्रंथांमुळे मदत होईल, असे मत ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.

विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम तीन स्पर्धकांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहिमेस सुरुवात; ‘टीबी’मुक्तीसाठी सहाय्य करणाऱ्यांचा सन्मान

लातूर शहर महानगरपालिकेमार्फत वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहीम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला आज क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. शहरातील गरोदर मतांची प्रसूती झाल्यानंतर या मोहिमेंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेमार्फत त्यांना वृक्ष भेट देण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरुपात पाच मातांना वृक्ष भेट देवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी होत लातूर शहर टी बी युनिट अंतर्गत 200 क्षयरुग्ण दत्तक घेवून त्यांना 6 महिन्यांसाठी आवश्यक 1200 फूडबास्केटचा पुरवठा करणाऱ्या लातूर एमआयडीसी येथील एडीएम ऍग्रो अँड विझाग प्रा. लि. यांचा ना. बनसोडे यांच्या सन्मान करण्यात आला. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या अग्निशमन वाहन, फिरते शौचालये आदीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed