• Fri. Nov 15th, 2024

    मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Sep 16, 2023
    मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    लेझर शोच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या जागवल्या आठवणी

    छत्रपती संभाजी नगर, दि. 16 :(विमाका) मराठवाड्याचा विकास हाच शासनाचा ध्यास असून मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास ४५ हजारांहून अधिक कोटींच्या विविध विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये पाणी वळविण्यासाठी १४ हजार कोटींची शासनाकडून तरतूद करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा श्री. शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिल्या. तसेच मुक्ती संग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना विनम्र अभिवादन केले.

    शहरातील क्रांती चौक येथे ‘गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक संचालनालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त जी.श्रीकांत आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री शिंदे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे, त्यांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    चांगली काम करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा एका वर्षाची परवानगी देण्याऐवजी पाच वर्षांची परवानगी द्यावी. निर्बंधमुक्त गणेशोत्सव, सण साजरे करण्यात यावेत, अशा सूचनाही महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना यावेळी केल्या.

    नाविन्यपूर्ण पद्धतीने लेझर शोद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती या कार्यक्रमात सादर करण्यात आली. महापालिकेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कलावंतांचा गौरवही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमास नामवंत कलकारांची उपस्थिती होती. या कलाकारांनी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed