- दिव्यांग आणि वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क
- निवडणूक यंत्रणा पोहोचली दुर्गम भागात
नागपूर, दि. १४: कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्दांनी मतदानाचा आज हक्क बजावला. अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात १४ आणि १५ नोव्हेंबर या दोन दिवशी गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात आज जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली.
रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात कट्टा, सावरा, तुलारा, बेलदा या दुर्गम भागातील गावातील नऊ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच कामठी येथील दिव्यांग असलेल्या विनायक कुलदीवार, फौजिया तब्बस्सुम सय्यद मोहम्मद अली तसेच राजेश मेश्राम यांनी आपल्या गृह मतदानाचा हक्क बजावला.
दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी काटोल विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण २३ पथके तयार करण्यात आली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण २४ पथके रवाना झाली. नागपूर उत्तर (अ.जा.)विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण ७ पथके, रामटेक विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५+ मतदारासाठी गृहभेट देवून मतदान घेण्यात येत आहे.त्यासाठी एकूण १५ पथके कार्यरत होती.
भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतदार गृहमतदानाचा हक्क बजावत आहेत. यात ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 416 तर शहरी विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 21 गृह मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार आहेत.
०००