• Mon. Nov 25th, 2024
    कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अशी’ असणार पर्यायी मार्ग आणि सुविधा केंद्रांची व्यवस्था

    वर्षभर आस लागून राहिलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणातील नागरिकांची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या पाहुण्यांचीही आतुरता लागून राहिली आहे. दर वर्षी न चुकता आपल्या कोकणातल्या घरी जाण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर परिसरातून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या स्वागतासाठी कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
    पश्चिम महाराष्ट्र-कोकण अंतर होणार कमी, कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या काजिर्डा घाटाची महत्त्वाची अपडेट
    कोकणात येणाऱ्या या गणेश भक्तांचा प्रवास हा अधिक सुखकर आणि सोपा व्हावा, यासाठी त्यांना आवश्यक सगळ्या सुविधा महामार्गावर सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेश करता बंदी घालण्यात आली असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. गणेशोत्सव १९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून गणेशोत्सवाकरीता गणेशभक्त कोकणात आपल्या गावी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करतात.

    मुंबई-गोवा मार्गीकेचे सिमेंट कॉकिटीकरणाचे एकेरी मार्गीकेचे काम प्रगती पथावर आहे. मात्र हे काम परिपूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचाही वापर केल्यास प्रवास अधिक सुखकर होऊ शकेल. चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईकडून कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हलक्या वाहनांना कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगदा ही तूर्तास सुरू करण्यात आला आहे. या बोगद्यातून सध्या केवळ हलकी प्रवासी वाहने आणि दुचाकी स्वारांना प्रवेश दिला जात आहे. काही कारणास्तव वाहतूक कोंडी विविध ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहे.

    दगडांचा आकार न बदलता फक्त आकर्षक मांडणीतून कलाकृती साकार

    कोकणासाठी पर्यायी मार्ग

    पेण पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    तरणखोप, पेण बायपास, पाली फाटा, पाली मार्गे वाकण

    वडखळ पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    वडखळ, पोयनाड, पेजारी चेकपोस्ट, नागोठणे मार्गे वाकण

    नागोठणे पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    नागोठणे, वेलशेत फाटा, वरवटणे, भिसेखिंड मार्गे वाकण
    किंवा रोहा मार्ग कोलाड

    वाकण पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    वाकण, पाली, नांदगाव, विळे, सुतारवाडी कोलाड
    किंवा निजामपूर मार्गे माणगाव

    कोलाड पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    कोलाड, सुतारवाडी, विळे, निजामपूर मार्गे माणगाव

    माणगाव पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    माणगाव, मोरबा नाका, मोरबा गाव, दहीवली, गोरेगाव, लोणेरे

    लोणेरी फाट्या पुढे वाहतूक कोंडी झाल्यास
    लोणेरे, गोरेगाव, आंबेतमार्गे म्हाप्रळ, महाड

    या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. रायगड जिल्हा पोलीस दलाकडून महामार्गावरती पाचशे पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा स्वरूपाचा बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशभक्तांसाठी सुविधा केंद्रांची देखील निर्मिती करण्यात आली आहे.

    गणेशभक्तांसाठी सुविधा केंद्र

    चहापान, वैद्यकीय, पोलिस मदत केंद्र, वाहन दुरुस्ती, फोटोगॅलरी, बालक आहार कक्ष अशा सुविधा चोवीस तास उपलब्ध
    तसंच शौचालय, रुग्णवाहिका, पोलीस मदत केंद्र उपलब्ध
    वाहन चालकांना हवा भरण्याची व्यवस्था तसेच मेकॅनिकही उपलब्ध करून दिला जाणार
    मोटार सायकल वरून पेट्रोलिंग तसेच आरोग्य पथक, रुग्णवाहिका क्रेन अशा सुविधाही या केंद्रांवरती असणार
    या सुविधा केंद्र स्वागत कक्ष चहापान व्यवस्थाही बहुतांश केंद्रावरती असणार आहे.
    कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अवघड वळणांचा ४० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर!

    सुविधा केंद्रांची ठिकाणे

    नवी मुंबई – कळंबोली, पलस्पे फाटा, कर्नाळा
    रायगड – खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणारे, महाड, पोलादपूर
    रत्नागिरी – अनुसया हॉटेल खेड, हॅप्पी ढाबा खेड, भोस्तेघाट, सवतसडा दर्शन. कळंबस्ते तिठा, सावर्डे बाजारपेठ, आरवली, संगमेश्वर एसटी स्टँड, वांद्री, हातखंबा तिठा, पाली, वेरळ, कुवे गणपती, राजापूर एसटी स्टँड

    प्रत्येक सुविधा केंद्रावर पोलीस समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०८ मोटर सायकल तसेच ९६ चारचाकी वाहनांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे. त्यामुळे या सुविधांचा वापर गणेशभक्तांनी करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून हा प्रवास सुखकर होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed