आरोपी तुषारने तरुणीला व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवून अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखविले होते. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफितीस लाइक मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून आरोपी आणि साथीदारांनी तिची दिशाभूल केली. ‘गुगल सर्च टास्क’ पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे तिला सांगण्यात आले. तरुणीने भूलथापांना बळी पडून काम सुरू केले. तिचा विश्वास मिळवण्यासाठी आरोपींनी काही रक्कम तिला पाठवली. यामुळे तिला हे काम खरे वाटू लागले. आरोपीने टेलिग्राम ग्रुपचा टास्क देऊन तरुणीकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपीने मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.
सायबर पोलिसांनी बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता आरोपी मुंबईतील जुहू भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने आरोपी तुषारला अटक केली. तपासासाठी त्याला येत्या १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक सचिन जाधव, अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनील सोनुने यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
ऑनलाइन टास्क, अर्धवेळ नोकरी, गुंतवणूक केल्यास जादा परतावा अशी आमिषे दाखविणाऱ्या कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नका. मोबाइल क्रमांक आणि प्रोफाइलची तक्रार करा.
मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक