• Sat. Nov 30th, 2024

    इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस

    ByMH LIVE NEWS

    Sep 15, 2023
    इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 15 : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान व नाविन्यता या विषयांमध्ये सहकार्य सातत्याने वाढत आहे. भारत – अमेरिका व्यापार वाणिज्य संबंध वाढविण्यासंदर्भात इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आपल्या स्थापनेपासून केलेले कार्य प्रशंसनीय आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

    इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण: व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास’ या विषयावर आयोजित परिषदेचे उद्घाटन राज्यपाल श्री.बैस यांनी शुक्रवारी (दि. 15) मुंबई येथे केले. त्यावेळी ते बोलत होते.

    परिषदेला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अमेरिकेच्या मुंबई दूतावासातील उपमुख्य अधिकारी माइकल श्रेडर, इंडो अमेरिकन चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, मानद सचिव कमल वोरा, महिला उद्योजक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या परिषदेला उपस्थित होते.

    आज राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर सरकारतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.  महाराष्ट्रात महिलांसाठी कौशल्य विकास, उद्यमशीलतेला चालना व आर्थिक समावेशन या टप्प्यांवर लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला देखील चालना मिळत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण तसेच संशोधन करण्याकडे कल आहे. या दृष्टीने उभय देशांनी विद्यापीठस्तरावर सहकार्य वाढवून विद्यार्थी व शिक्षक आदान प्रदान वाढविल्यास तसेच किमान एक सत्र परस्पर विद्यापीठात करण्यास अनुकूलता दर्शविल्यास त्याचा उभय देशांच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

    आज युवा लोकसंख्येचा लाभ भारताकडे असून अमेरिकन कंपन्यांनी भारतातील युवा शक्तीला कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धनात सहकार्य केल्यास त्याचा लाभ देखील सर्वांना होईल, असे राज्यपालांनी सांगितले.  स्वच्छ ऊर्जा, आरोग्य सेवा, पर्यटन और शाश्वत शेती या क्षेत्रांमध्ये सामूहिक प्रयत्नांमधून परिणामकारक बदल होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

    भारत दहाव्या क्रमांकाच्या आर्थिक महासत्तेवरून काही वर्षात पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता झाला असून लवकरच आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

    व्यापार व वाणिज्य संबंध हे द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे. आज भारत व अमेरिका संरक्षण, अंतरिक्ष विज्ञान यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करीत असून शासन, खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांनी हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे अमेरिकेचे मुंबईतील उपमुख्य अधिकारी माइकल श्रेडर यांनी सांगितले. कमल वोरा यांनी प्रास्ताविक केले तर राज्यलक्ष्मी राव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed