कुटुंबातील कर्ता पुरुष जेव्हा दारूच्या आहारी जातो तेव्हा ते संपुर्ण कुटूंब उध्वस्त होते. व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील पुरुष दारू पितो तेव्हा त्या कुटुंबातील महिला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागते. दिवसभर कुटुंबासाठी काबाड कष्ट करून सायंकाळी घरी आल्यानंतर दारू पिणाऱ्या नवऱ्याची शिवीगाळ आणि मारही पत्नीला खावा लागतो. याच गोष्टींना कंटाळून गावातील सर्व महिला एकवटल्या आणि त्यांनी दारूबंदीचा एल्गार केला. शेकडो महिलांनी दारू विक्री होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी जात तेथील सामानाची मोडतोड केली. मात्र दारू विक्रेत्यांनी आंदोलनाची खबर लागल्याने दारू आणि साहित्य लंपास केले होते.
मात्र येथील टेबल, खुर्च्या, ड्रम, शेड, कनाती आदीची मोडतोड करत त्या साहित्याला एकत्र करत ते जाळून ही टाकले. यावेळी हातात काठ्या घेऊन दारूबंदी झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. गावातील सात ठिकाणी दारू विक्री होत होती. त्या सर्व ठिकाणी या महिलांनी जाऊन तेथील साहित्याची मोडतोड केली. एक दोन ठिकाणी काही दारूच्या बाटल्या सापडल्या त्या संतप्त महिलांनी फोडल्या. आगामी काळात दारू विक्री करू नका, असा सज्जड दम महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला आहे.
गावाच्या हद्दीत दारू विक्री करणाऱ्यांला चोपून काढू. तसेच दारू पिणाऱ्याला पण रेटून काढू, असा निर्धार शिंदे येथील उग्र रूप घेतलेल्या गावातील महिलांनी व्यक्त करत दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी जाऊन तेथे मोडतोड केली. ही ठिकाणे उद्ध्वस्त करत दारू विक्री करणाऱ्यांना योग्य ती समज महिलांनी दिली. शेवटी ग्राम पंचायत समोर झालेल्या महिलांसह ग्रामस्थांच्या बैठकीत आजच्या पोळ्या दिवशी आसूड उगारून दारू विक्री करणाऱ्यावर आणि दारू पिणाऱ्यांना जाहीर समज ही दिली. आता आमच्या गावात आम्हीच शासन, असा नारा देत महिलांनी आपला रुद्रावतार शिंदे गावात दाखवून दिला आहे.