मुंबई, दि. 15 : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी सायं. 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 108 शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी एनसीपीए सेंटर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम राज्यात सर्वांना पाहता यावा यासाठी पुरस्कार सोहळ्यावर आधारित एक तासाच्या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून येत्या रविवारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची दूरदर्शन निर्मिती वैष्णो व्हिजनचे निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर यांनी केली आहे, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/