• Mon. Nov 25th, 2024

    नागपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरचं जपानमध्येही कौतुक; भन्नाट संशोधनाने कोट्यवधी जीव वाचणार

    नागपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरचं जपानमध्येही कौतुक; भन्नाट संशोधनाने कोट्यवधी जीव वाचणार

    नागपूर : ‘श्वसनाशी संबंधित आजारांच्या उपचारात फुप्फुसातील ‘पल्मनरी सरफेक्टंट’वर लक्ष केंद्रित केले, तर भविष्यात करोनासारख्या महामारी रोखता येऊ शकतात’, असे संशोधन मुळात मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या नागपूरच्या मकरंद फडके यांनी केले आहे. अलीकडेच जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय केमिकल थर्मोडायनेमिक्स परिषदेत त्यांनी हे संशोधन सादर केले. ‘रेस्पिरेटरी ह्युमिडिफिकेशन अॅण्ड जेनेसिस ऑफ कोव्हिड’ हा त्यांचा विषय होता.

    अभियंता असल्याने फडके यांचा खरा संबंध भौतिकशास्त्राशी आहे. त्यामुळे भौतिकशास्त्र व शरीरशास्त्र यांचा काय संबंध, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, या दोहोंत घट्ट नाते असल्याचे फडके सांगतात. वैद्यकीय अभ्यासक्रमातील फिजिऑलॉजीमध्ये ५० टक्के भौतिकशास्त्रच आहे. त्यामुळे ‘संबंध नाही’ असे म्हणणे चुकीचे आहे. हा संबंध उलगडून त्याद्वारै वैद्यकीय उपचारांमध्ये काय बदल करता येऊ शकतील, याचा अभ्यास अभियंत्यांना करायचा आहे.

    करोनाच्या आगमनानंतर त्यावरील लशीसाठी जगभर प्रयत्न सरू झाले. भारतासह काही देशांनी लस शोधली. ती लोकांना देण्यात आली. मात्र, मुळात हा विषाणू फुप्फुसापर्यंत कसा पोहोचला, तेथे जाऊन त्याने इतकी प्रचंड हानी कशी केली, हे अद्यापही कळलेले नाही. फडके यांच्या मते, कोव्हिड किंवा अन्य कोणत्याही विषाणूच्या फुप्फुसातील प्रवेशात पल्मनरी सरफेक्टंटची सर्वात मोठी व महत्त्वाची भूमिका असते. साध्या डोळ्यांनी दिसणार नाही असा हा पातळ पापुद्रा म्हणजे फुप्फुसाची संरक्षक भिंतच असते. श्वसनप्रक्रियेत ऑक्सिजन आत घेऊन कार्बनडाय ऑक्साइड बाहेर सोडला जातो. या दोन वायूंची देवाणघेवाण फुप्फुसातील या सरफेक्टंटमार्फत होत असते. या भिंतीतून प्राणवायूला आत येण्याची आणि कार्बन डायऑक्साइडला बाहेर जाण्याची परवानगी असते. बाकी कुणालाही अशा ये-जाची परवानगी हा सरफेक्टंट देत नाही. मात्र, एखाद्या विषाणूच्या हल्ल्याने जेव्हा सरफेक्टंटला हानी होते, त्यावेळी फुफ्फुसाचा संसर्ग होत असतो. कोव्हिडमध्ये संबंधित विषाणूने सरफेक्टंटची केलेली हानी मोठी होती. त्यामुळे फुप्फुसाचा संसर्गही जास्त होता. श्वसनाशी संबंधित आजार रोखण्यासाठी भविष्यात पल्मनरी सरफेक्टंट केंद्रस्थानी ठेवून उपचारांची आखणी झाली तर आपण फुप्फुसाचे संरक्षण करू शकतो, असे फडके यांनी या संशोधनात म्हटले आहे. मागीलवर्षी नागपुरात झालेल्या सायन्स काँग्रेसमध्येही त्यांनी आपले हे संशोधन मांडले होते.

    करोनातील लॉकडाउनमध्ये ते फुप्फुस संसर्गाचा विचार करू लागले. त्यापूर्वी त्यांनी फिजिऑलॉजीचा अभ्यास केला होता. त्यामुळे फुप्फुसातील क्रिया-प्रक्रिया भौतिकशास्त्रातील अभियांत्रिकीच्या निकषांवर ताडून पाहिल्या. त्यावेळी श्वसन प्रक्रियेत थर्मोडायनेमिकच्या मूळ तत्त्वांचा आणि ‘सरफेस टेन्शन’ व ‘डायइलेक्ट्रिक्स’ या संकल्पनेचा त्यात अंतर्भाव असल्याचे लक्षात आले.
    Explainer : Nipah Virus चा फैलाव कसा होतो? जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय
    जपानमध्ये प्रशंसा

    या संशोधनद्वारे विषाणू फुप्फुसातील आरएनए-डीएनपर्यंत कसा पोहोचतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. जपानमध्ये त्यांच्या संशोधनाची प्रशंसा करतानाच हे सर्व प्रतिकृतीद्वारे (मॉडेल) सादर करण्याची सूचना त्यांना तज्ज्ञांनी केली. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्टपणे कळू शकणार आहे. भविष्यात करोनासारखी महामारी आली तर ‘पल्मोनरी सरफेक्टंट’ हा उपचाराचा प्रथम बिंदू असावा, असा त्यांचा आग्रह आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed