• Sat. Sep 21st, 2024

आरोग्य केंद्रांनाच गरज उपचारांची; वसईतील या केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आरोग्य केंद्रांनाच गरज उपचारांची; वसईतील या केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, पालघर : वसई तालुक्यातील महापालिका हद्दीतील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १२ उपकेंद्रे पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी पालिकेने केली होती. त्याला राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही मान्यता दिली होती. मात्र हस्तांतरणाबाबत जिल्हा परिषद आणि पालिका यांच्यामधील तिढा सुटलेला नसल्याने हस्तांतरण प्रक्रिया अद्याप अधांतरी आहे. या दिरंगाईमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांवरच उपचार करण्याची वेळ आली आहे. या आरोग्य केंद्रांची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा ही केंद्रे महापालिकेकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्हा परिषदेने वसई तालुक्यात नवघर, चंदनसार, भाताणे, नालासोपारा, आगाशी, कामण, पारोळ व निर्मळ अशा आठ ठिकाणी ३२ उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांतून परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने काही केंद्रांच्या भिंतींना तडे गेले आहेत. काही ठिकाणी स्लॅब निखळले आहेत. छताला गळती लागल्याने ताडपत्रीचा आडोसा घेऊन रुग्णसेवा करावी लागत आहे. मांडवी येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीला तर लोखंडी खांबाचा टेकू लावण्यात आला आहे. पारोळ केंद्रातील सौर पॅनेल बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास अंधारात उपचार करावे लागत आहेत. या विविध समस्यांमुळे आरोग्य केंद्रातील सेवक तसेच रुग्णांना जीव मुठीत धरूनच इमारतींत प्रवेश करावा लागत आहे. वसई-विरार शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले असून तात्काळ या आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही दुरवस्था झाली आहे. येथे पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णसंख्या खालावली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी थेट पालिका रुग्णालयांत जात आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी वसई-विरार महापालिका हद्दीतील सोपारा, निर्मळ, चंदनसार ही तीन केंद्रे तसेच नायगाव, सांडोर, उमेळा, निर्मळ, चंदनसार, पेल्हार, बोळींज, गोखिवरे, जूचंद्र, सातिवली, वालिव आदी १२ उपकेंद्रे महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे केली होती. महापालिकेनेही ही केंद्रे आपल्याकडे हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रे पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारने २०२१मध्ये सहमती दिली. मात्र ही केंद्रे जागेचे मूल्य आणि इतर अटी-शर्तींच्या कचाट्यात सापडल्याने महापालिकेकडे अजूनही हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. ही आरोग्य केंद्रे तातडीने पालिकेकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी वसईतील ग्रामस्थांनी केली आहे.
अन्नदाता वाऱ्यावर! वसई-विरार पालिका क्षेत्रात समाविष्ट असल्याने ३९ गावे किसान योजनेपासून वंचित
ही केंद्रे पालिकेकडे सोपवण्याची मागणी
आरोग्य केंद्रे : सोपारा, निर्मळ, चंदनसार
आरोग्य उपकेंद्रे : नायगाव, सांडोर, उमेळा, निर्मळ, चंदनसार, पेल्हार, बोळींज, गोखिवरे, जूचंद्र, सातिवली, वालिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed