मुंबई, दि. 12 :- दूध खरेदी – विक्रीसाठी अनिवार्य केलेल्या इलेक्ट्रीक तोलन उपकरणांच्या वापराबाबत तक्रारदार दूध उत्पादक शेतकरी व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
दूध संकलन केंद्रांवर दूध मापनासाठी 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरणांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, 10 ग्रॅम अचूकतेचे इलेक्ट्रिक तोलन उपकरण वापरात दूध उत्पादक आणि दूध विक्री करणाऱ्या संस्थांना अडचणी येत आहेत. यात दूध उत्पादकांचा तोटा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांच्यासमवेत आज बैठक घेण्यात आली.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. सुरेश मेकला, विलास पवार, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी दयानंद पाटील, केरबा पाटील, श्यामराव पाटील, विश्वास पाटील, संजय पाणारी उपस्थित होते.
दहा ग्रॅम वजन काट्यावर वजन घेत असताना काटा स्थिर होण्यास वेळ लागतो. पर्यायाने दूध संकलनास वेळ लागत असल्यामुळे संघाने ठरवून दिलेल्या वेळेत दूध संकलन होत नाही. सोबतच दुधाच्या गुणावर परिणाम होऊन संस्थेचा व पर्यायाने दूध उत्पादकांचाही तोटा होत आहे. वजन काटा वेळेत स्थिर होत नसल्याने दूध उत्पादक आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे सध्याचा इलेक्टिक तोलन उपकरण वापरण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना यांनी केली. यावर मंत्री श्री. भुजबळ यांनी संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
००००
मनीषा सावळे/विसंअ/