• Mon. Nov 25th, 2024

    धरणांची ओंजळ भरली! नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर, कोणत्या धरणात किती पाणी?

    धरणांची ओंजळ भरली! नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर, कोणत्या धरणात किती पाणी?

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गेल्या आठवड्यात सोमवारी जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ५९ टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे धरणांची ओंजळ अखेर भरली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. सर्वात मोठ्या गिरणा धरणात ५३ टक्के, तर पालखेड धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४२ टक्क्यांची भर पडून तो ९७ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

    मालेगाव, नांदगावसह खान्देशची भिस्त गिरणा धरण समूहातील गिरणा धरणावर आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेले धरण म्हणून ते ओळखले जाते. १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. त्यामुळे अन्य धरणांच्या तुलनेत हे धरण भरायला वेळ लागतो. यंदा तर या धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरविल्याने या धरणांमधील पाणी साठा ऐन पावसाळ्यात वाढण्याऐवजी कमी होत चालला होता. त्यामुळे येथील पाणी टंचाईची तीव्रता वाढतच चालली होती. परंतु, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या धरण समूहातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. विशेषत: गिरणा धरणासाठी हा पाऊस लाभदायी ठरला असून, हे धरण निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. या धरणात सध्या ९ हजार ७१९ दलघफू एवढा पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच काळात हे धरण भरलेले होते. सप्टेंबर २०२२च्या सुरुवातीला १८ हजार १६७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत अजूनही ४५ टक्के पाणीसाठा कमीच आहे.

    तीन दिवसांत १६ टक्के वाढ

    गिरणा धरणातील पाणीसाठा ७ सप्टेंबरला ३७ टक्के होता. म्हणजेच धरणात ६ हजार ८८६ दलघफू एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे गिरणातील पाणीसाठ्यात १६ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच हा पाणीसाठा २ हजार ८३३ दशलक्ष घनफुटांनी वाढला आहे. ९ सप्टेंबरला हा पाणीसाठा सात टक्क्यांनी वाढून ४४ टक्क्यांवर पोहोचला, तर ११ सप्टेंबरला तो ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे ७ सप्टेंबरला धरणांमधील एकूण पाणीसाठा ६७ टक्के होता. तो १२ टक्क्यांनी वाढून ७९ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ५२ हजार १९६ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले आहे.
    दुष्काळी सिन्नरला ‘सुजलाम् सुफलाम्’चे वेध; दमणगंगा-देव नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल सादर
    धरणनिहाय पाणीसाठा स्थिती
    धरण-७ सप्टेंबर-११ सप्टेंबर

    गंगापूर ९१ ९५
    काश्यपी ६३ ८१
    गौतमी गोदावरी ५८ ७८
    आळंदी ८८ १००
    पालखेड ५५ ९७
    करंजवण ६८ ९०
    वाघाड ८१ १००
    ओझरखेड ४७ ८७
    पुणेगाव ९२ ९४
    तिसगाव ० २९
    दारणा ८७ ९७
    भावली १०० १००
    मुकणे ७८ ८५
    वालदेवी १०० १००
    कडवा ८५ ९३
    नांदूर मध्यमेश्वर १०० १००
    भोजापूर ७१ १००
    चणकापूर ९३ ९३
    हरणबारी १०० १००
    केळझर १०० १००
    नाग्यासाक्या ०० ००
    गिरणा ३७ ५३
    पुनद ७५ ९२
    माणिकपुंज ०० ००
    एकूण ६७ ७९

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed