यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे संपादक अभिजीत कांबळे, पुणे येथील वरिष्ठ पत्रकार पंकज इंगोले, न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागाचे डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्हास्तरावरील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारिता बळकट होणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पत्रकारितेला व्यापकता यावी. सर्वसामान्य माणूस त्याचे प्रश्न जेव्हा स्वत: जगासमोर मांडेल तेव्हाच हे स्वरूप व्यापक होईल. आजपर्यंत जगातील बहुतांशी ब्रेकिंग न्यूज या सर्वसामान्यांच्या माध्यमातूनच समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करावयाचे तर याचे प्राथमिक प्रशिक्षण, निर्भिड आणि निपक्ष:पातीपणे काम करण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.
अभिजीत कांबळे यांनी संवाद साधतांना सांगितले की, डिजिटल माध्यमातून ग्रासरुट जर्नालिझम करण्याची चांगली संधी आहे. याची सुरुवात करत असताना तंत्रज्ञानाचे बारकावे आत्मसात करावेत. दुर्लक्षित घटकातील एखाद्या ज्वलंत विषयाची धोरणात्मक मांडणी करावी. यातून सरकारी पातळीवर दखल घेऊन तो प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो. प्रत्येकाला स्वत:चे चॅनेल अथवा वृत्तपत्र सुरू करणे शक्य नाही. मात्र सोशल माध्यमातून आपण पत्रकारितेची सुरुवात करून सामाजात विश्वासार्हता निर्माण करून त्याला व्यापक स्वरुप देऊ शकतात. तुमच्या माध्यमाची लोकप्रियता वाढली तर यातून आर्थिक उत्पन्नही मिळते.
अभिजीत कांबळे यांनी पुढे सांगितले की, जे जमिनीस्तरावरील, तळागाळातील विषय आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यासंबंधीचे विषय मांडणे म्हणजे ग्रासरूट जर्नालिझम होय. त्यामुळे पत्रकारांनी बातम्या करत असताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. वेबसाईट, सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब ह्या डिजिटल माध्यमातून ग्रासरूट जर्नालिझम प्रभावीपणे करता येते. परंतु त्यासाठी पत्रकारितेचे मुलभूत प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील झालेल्या विविध प्रयोगाविषयी उदाहरण देत स्पष्ट केले. प्रत्येकाची बातमी लिखानाची पद्धत वेगळी असते. वाचक वर्ग वेगळा असतो. त्यामुळे कोणाचे लिखाण करताना कॉपी करू नये, स्वतःची वेगळी शैली निर्माण करावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रास्ताविक करताना डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला आहे. ग्रासरूट जर्नालिझमचे आदर्श मॉडेल्स अहमदनगर जिल्ह्याने दिले आहेत. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत कशा पद्धतीने पत्रकारिता करता येऊ शकते, याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने माध्यम क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याची माहिती व्हावी या दृष्टीकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तळागाळातील समुदायाचे प्रश्न समजून घेण्यासाठी संवेदनशील आणि प्रभावशाली पत्रकार घडवणे गरजेचे आहे. या अनुषंगाने प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत या वर्षापासून जर्नालिझम व मास कम्युनिकेशन या विषयाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. या अभ्यासक्रमासाठी नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली असून सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम तीन स्तरावर असणार असून विद्यार्थ्यांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स, दोन वर्षाचा डिप्लोमा तर तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम अशा स्वरुपात पूर्ण करता येणार आहे. किमान बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्याशाखेच्या विध्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
आजच्या काळात पदवीबरोबरच कौशल्यास विशेष महत्व आहे. ज्यांच्याकडे प्रभावी कौशल्य असतील त्यांना करिअरच्या अनेक संधी मिळतात. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने कौशल्य विकासावर आधारित अभ्याक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयात सुरु व्हावेत यासाठी बी.होक. या योजनेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांची सुरूवात केली आहे. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी हा उत्तम पर्याय विध्यार्थ्यांकडे असणार आहे त्यामुळे माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी सदर कोर्ससाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेश पठारे यांनी केले.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या स्वरुपात चर्चासत्र पार पडले. अनेकांनी आपल्या शंका आणि प्रश्न विचारत संवाद साधला. मान्यवरांनी अनेकांच्या शंकांचे निरसन केले. आभार डॉ. सुरेश मुगुटमल यांनी मानले तर सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सीएसआरडी संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.