• Sat. Sep 21st, 2024
धक्कादायक…! महिला शेतावर गवत काढण्यात मग्न; अचानक अनर्थ अन् होत्याचं नव्हतं झालं

गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार मारल्याची घटना घडली आहे. महिलेला वाघाने जंगलात ओढत नेले असता गावकऱ्यांनी लगेच धाव घेतली. मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता.
एक गोष्ट लपवण्यासाठी पाप; निष्पाप जीवाला संपवलं, अखेर जोडपं सापडलं अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, महानंदा दिनेश मोहुर्ले (४८) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती शिवराज-फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगलालगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत काढायला गेली होती. ती गवत काढण्यात मग्न असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला करत तिला ठार केले. हल्ला होताच महानंदाने प्राणांतिक किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले. तेव्हा वाघ महानंदाचे शरीर ओढून नेत असल्याचे दिसून आले.

शिवशक्ती यात्रा दणक्यात संपन्न; पंकजा मुंडेंनी अभिषेक करत घेतलं पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचं दर्शन

लोकांनी मोठमोठ्याने आवाज करत धाव घेतली असता वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत महानंदाचा मृत्यू झाला होता. सध्या शेतातील निंदणी सुरू आहे. तसेच पाऊस पडल्याने पाणी लावण्यासाठी आणि इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतात जातात. मात्र या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानीची तात्काळ आणि दीर्घकालीन भरपाई नियमांनुसार पिडीत परिवाराला देण्यात येणार असल्याचे वडसा वन विभागाचे विभागीय वनाधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना आणि शेतीकामावर जाणारे, गुराखी अशा सर्व संबंधिताना मोठ्या गटागटाने कामावर जाण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed