‘साखर नियंत्रण आदेश १९६६’नुसार, साखर कारखान्यांशी संबंधित व्यापारी, वितरकांकडून साखरेच्या साठ्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामध्ये संबंधितांचा ‘पॅन’, ‘जीएसटी क्रमांक’, मोबाइल क्रमांक आणि मे ते ऑगस्ट दरम्यान किती साखरेची विक्री केली, याचा तपशील जाणून घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी साखरेचा २५ लाख टनांचा कोटा खुला केला आहे. तरीही साखरेचे दर वाढत असून, ते प्रति क्विंटल ३९५० ते ४००० रुपयांवर पोहोचले आहेत. श्रावण महिन्यातील सणवार आणि आगामी गणेशोत्सवामुळे साखरेला मोठी मागणी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकार खबरदारी घेत आहे. त्यासाठी साठेबाजांवर करडी नजर ठेवली जात आहे.
दरात पन्नास रुपयांची घट
साखरेची दरवाढ होत असल्याने घाऊक बाजारातील मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘एस ३०’ ग्रेडच्या साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांची घट झाली असून, ते प्रति क्विंटल ३९०० ते ३९५० रुपयांवर आले आहेत. बाजारात जीएसटी चुकवून साखरेची आवक होत असल्याने ही घसरण होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही साखर कारखान्यांकडूनही साखरविक्रीला हात आखडता घेतला जात असून, उच्च दरात खुल्या साखर विक्रीकडे कल वाढत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.