आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. तुरुंग अधिकारी अमिताभ गुप्ताही थोड्या वेळातच येरवडा कारागृहात पोहोचणार आहेत. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.
आरोपींच्या शिक्षेसाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलने
आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलने झाली. आता जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामध्येही या आरोपींनी तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली. काल सायंकाळीच प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे चक्री उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्या आरोपीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र यावरून आता जेलप्रशासनाला धारेवर धरले जात असून हा विषयावरूनही आंदोलने होण्याची शक्यता आहे.
कोपर्डी निर्भया हत्याकांड
१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीतल अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला. त्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आहे. त्याला घटनेनंतर पोलिसांनी श्रीगोंद्यातून अटक केली. त्यानंतर इतर आरोपी अटक झाले. त्यांच्याविरूद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र पाठविण्यात आले होते. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिवाय तिघांनाही 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
त्यानंतर आरोपी संतोष भवाळ याने या शिक्षेला मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हाने दिले. तर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारच्यावतीनेही उच्च न्यायालयात प्रकरण नेण्यात आले आहे. आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून हे संपूर्ण प्रकरण औरंगाबादहून मुंबईला वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग झाले. सध्या खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे. या काळात तिन्ही आरोपींनी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.