• Sat. Sep 21st, 2024

आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2023
आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार : दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त ) आदिवासी बांधवांसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजनांची आखणी केली आहे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले, ओळखपत्रे त्यांच्याकडे असणे अनिवार्य असते. केवळ ती नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या योजना व त्यांच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे आदिवासी बांधवांना लागणारी सर्व ओळखपत्रे व दाखल्यांचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार असून घरकुल योजनेच्या लाभासोबत आता रोजगार व्यवसायाच्याही संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते नंदुरबार येथे आयोजित आदिवासी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या अडचणी समजून घेताना बोलत होते.  यावेळी तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस व विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार शहरातील ज्या आदिवासी बांधवांकडे स्वत:चे घरकुल नाही त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास दिवाळीच्या आत त्यांना घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. तसेच ज्यांच्याकडे आधार, रेशन, आभा यासारखी कार्ड्स व जातीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला, बॅंक खाते नसणे यासारख्या अडचणी असतील यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह प्रशासनाच्या माध्यमातून घेऊन ती प्रत्येकाला देण्याची मोहिम सुरू आहे. यासाठी कुठल्याही आदिवासी बांधवाला कुठलेही शुल्क अथवा अनावश्यक पैसे द्यावे लागणार नसून अशा कागपत्रांसाठीचा लागणारा सर्व खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले रेशन कार्ड स्वतंत्र केले नसतील ते स्वतंत्र करावित, आधार, बॅंक खाते यासारख्या  विविध जीवनोपयोगी दस्तावेज प्राप्त करून घ्यावेत. ज्यांच्याकडे ही स्वतंत्र कागपत्रे नाहीत त्यांनी कुठल्याही घरकुल अथवा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आदिवासी वस्त्यांवर राहाणाऱ्या सर्व नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून घरकुलासोबत आदिवासी वस्त्यांवर रोजगार व व्यवसाय निर्मितीलाही चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीसाठी व अनुकुल व्यवसाय उभारण्यासाठी शासनामार्फत मदत केली जाणार आहे. आदिवासी वस्त्यांमधील साफसफाई, विद्युतीकरण, रस्त्यांची डागडूजींची कामे  तातडीने पूर्ण करावीत. एकही नागरिक त्यांच्या मुलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी नगरपालिका व तालुका प्रशासनाने घेण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपस्थित नागरिकांपैकी प्रत्येक नागरिकांच्या समस्या पालकमंत्री डॉ. गावित यांनी जाणीवपूर्वक ऐकून घेतल्या. कार्यक्रमास शहरातील नागरिक,महिला,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed