भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, गुरुवारपासून मुंबईत पावसाचे आगमन झाले. शुक्रवारीही सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरूच होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रातही चांगलाच पाऊस पडला. गुरुवारी पडलेल्या पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांपैकी तानसा, तुळशी आणि विहार तलाव पूर्णपणे भरून वाहू लागले. मध्य वैतरणा धरण ९८.५९ टक्के भरले आहे. खबरदारी म्हणून या धरणाचे पाच दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहेत. हे धरण पूर्णपणे भरल्यास उर्वरित दरवाजेही उघडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोडक सागर तलावात ७ सप्टेंबरला ९१.८० टक्के पाणीसाठा होता. हा साठा आता ९४.८८ टक्के झाला आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा तलावात अनुक्रमे ८१.४५ टक्के आणि ९३.३८ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती देण्यात आली.
साधारण तीन टक्क्यांनी वाढ
सातही तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. गुरुवारपासून पडलेल्या पावसामुळे १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला असून हा साठा ९३.१७ टक्के आहे. हाच पाणीसाठा दोन दिवसांपूर्वी ९० टक्के होता. आणखी दोन ते तीन दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास तलाव पूर्णपणे भरू शकतात. त्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवारही राहणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
७ सप्टेंबरपर्यंतची स्थिती
तलाव पाऊस (मि.मी.)
अप्पर वैतरणा ११२
मोडक सागर १३५
तानसा १२१
मध्य वैतरणा १०५
भातसा ११९
विहार ११३
तुळशी १०७