• Mon. Nov 25th, 2024

    कॉपी बहाद्दरांना दणका; ‘स्वारातीम’मध्ये १ हजार २७० विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्याचा निर्णय

    कॉपी बहाद्दरांना दणका; ‘स्वारातीम’मध्ये १ हजार २७० विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्याचा निर्णय

    नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षेमध्ये कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. चार विद्याशाखांमध्ये एकूण एक हजार ७२० विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्लूपीसी-व्होल परफॉर्मन्स कॅन्सल) अशी कडक शिक्षा करण्यात आली आहे. बीसीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याने तर त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा चिकटवून ‘मला पास करा’ असे लिहून उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सादर केल्या आहेत.

    मानव्य विद्याशाखेतील ४८८ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील २७८ विद्यार्थी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३३९ आणि आंतरविद्याशाखेतील ६१५ असे एकूण एक हजार ७२० विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करण्यात आली आहे. गैरवर्तणूक केलेल्यापैकी तीन विद्यार्थ्यांना सर्व संपादणूक रद्द आणि अधिक चार परीक्षेसाठी बंदी अशी कडक शिक्षा करण्यात आलेली आहे.

    नांदेड येथील एका विद्यार्थ्याने बीसीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये पाचशे रुपयांच्या कडक नोटा टिस्कोटेपद्वारे चिकटवून उत्तरपत्रिकेमध्ये ‘मला पास करा’ असे लिहूनउत्तरपत्रिका परीक्षकांकडे सादर केल्या. नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर सदर बाब परीक्षकांच्या निर्देशनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठविण्यात आल्या. सदर गैरवर्तणुकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ अन्वये विद्यापीठाच्या गठीत ४८ (५) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. समितीने सदर गैरवर्तणूक प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयाची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षेसाठी बंदी घालण्यात आली आहे. सदर रक्कम रुपये साडेतीन हजार कुलगुरू फंडामध्ये जमा करण्यात आलेली आहे.

    लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सदर बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. संबंधित परीक्षा केंद्राने हे प्रकरण विद्यापीठाच्या निर्देशनास आणून दिले. त्यानुसार ही बाब समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले. समितीने खऱ्या आणि तोतया अशा दोन्हीही परीक्षार्थ्यांना बोलावून कसून चौकशी केली. चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. याबाबत दोघांचीही उन्हाळी-२०२३ परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षेसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

    दहा वर्षांतील पहिलीच घटना

    ‘विद्यापीठातर्फे अशी कडक शिक्षा देण्यासंबंधी मागील दहा वर्षांतील पहिलीच घटना आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यावर वचक बसला आहे. यामुळे भविष्यामध्ये कोणताही विद्यार्थी परीक्षेत गैरवर्तवणूक करण्याचे धाडस करणार नाहीत. भविष्यात असे प्रकार आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाद्वारे विशेष पथक नेमण्यात येणार आहे,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे.
    विद्यार्थ्यांच्या गुणदानात हलगर्जीचा ‘अवगुण’ महागात; प्राध्यापकांचा दंड लाखोंच्या घरात जाणार
    संपादणूक रद्द करणे म्हणजे काय?

    या वर्षी अथवा या सेमिस्टरमध्ये देण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा निकाल हा शून्य करण्यात येतो. यामधील दोन विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव (आरटीडी-रिझल्ट टू बी डिक्लेअर्ड) ठेवण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed