म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील पहिल्या क्रमांकाचे नेते कोण? त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम केले, याचाच अर्थ ते अपयशी ठरले आहेत’, असा पलटवार शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नेत्यांवर केला.
‘प्रस्थापित नेत्यांच्या काळात पक्षाचा विस्तार झाला नाही’, असा नाराजीचा सूर प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी अजित पवार गटाच्या मेळाव्यात लगावला. याकडे लक्ष वेधले असता, ‘विदर्भात प्रफुल्ल पटेल आमचे सर्वोच्च नेते होते. तेच तशी कबुली देत आहेत’, असे अनिल देशमुख म्हणाले. मुंबईहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार गटावर तोफ डागली. शिवसेनेचे पक्ष व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले. केंद्राचे पाठबळ फुटीर गटाला आहे. त्यामुळे अजित पवार गटालाही तशीच पुनरावृत्ती होईल, अशी आशा असावी. मात्र, पक्ष व चिन्हाचा निर्णय आयोग घेईल. मोठे नेते पक्ष सोडून गेले, अशी कबुली देत अनिल देशमुख यांनी ‘कार्यकर्ते आणि जनता शरद पवार यांच्यासोबत आहे’, असा दावा केला.
गोंदिया-भंडाऱ्यात मेळावा
राज्यातील एकंदर राजकीय घडामोडींमुळे जनतेची सहानुभूती महाआघाडीच्या नेत्यांसोबत आहे. आम्ही करत असलेल्या दौऱ्यात कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभ आहे. जिल्ह्याजिल्ह्यांत मेळावे घेण्यात येणार आहेत. शरद पवार लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहेत. पुढच्या महिन्यात गोंदिया व भंडारा येथे मेळावे होतील. यानंतर नोव्हेंबरमध्ये नागपुरात मेळावा होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
जरांगे पाटलांनंतर लातूरमध्ये आदित्य देशमुखांचं आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन स्थळी सुप्रिया सुळेंकडून विचारपूर!
केंद्राने निर्णय घ्यावा!
‘ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. ओबीसी विरुद्ध मराठा परस्परांविरुद्ध दंड थोपटतील, असे प्रयत्न राज्यकर्त्यांनी करू नयेत. केंद्राने संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घ्यावा. १५-१६ टक्के आरक्षण वाढवल्यास हा तिढा सुटू शकतो. त्यासाठी विधिमंडळाचा प्रस्ताव हवा असल्याने राज्य सरकारनेही एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे’, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.