• Sat. Sep 21st, 2024

पुण्यातील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आई आणि बाळांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली अपडेट

पुण्यातील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आई आणि बाळांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: औंध जिल्हा रुग्णालय येथे एका गर्भवती महिलेने तीन बाळांना जन्म दिला. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने घरी एका बाळाला, तर रुग्णालयात दोन बाळांना जन्म दिला असून, तिन्ही बाळे सुखरूप असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

पोटात किती गर्भ आहेत, याची कल्पना या महिलेला नव्हती. प्रसूतीकळा घरीच सुरू झाल्या आणि महिलेने एका बाळाला घरीच जन्म दिला. महिला २२ ऑगस्ट रोजी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिने सायंकाळी ७.५० वाजता दुसऱ्या मुलीला व त्याच्या पाठोपाठ ७.५६ वाजता तिसऱ्या मुलीला जन्म दिला. दोन्ही मुलींचे वजन १४०० व १४५० ग्रॅम इतके कमी आहे. घरी जन्मलेल्या मुलाचे वजन १,६२० ग्रॅम आहे. या महिलेला याआधी तीन मुली आहेत.

स्त्री रुग्णालयासमोरील रिक्षामध्ये महिलेची प्रसुती; डॉक्टर निरोप समारंभात व्यस्त, हिंगोलीतील संतापजनक प्रकार

‘घरी जन्मलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्यासह रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले. तिन्ही नवजात बालकांना ऑक्सिजन, सलाइन देण्यात आले. अकरा दिवस उपचार दिल्यानंतर बाळांचे वरचे दूध बंद करून आईचे दूध देण्यात आले. आता महिलेसह बाळांना लवकरच ‘डिस्चार्ज’ दिला जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

‘तिळे जन्मणे ही दुर्मीळ घटना’

‘गर्भवती महिलेची साडेआठ महिन्यांतच प्रसूती झाली आहे. सद्यस्थितीत बाळांची प्रकृती चांगली आहे. तिळे जन्माला येणे ही दुर्मीळ घटना आहे. यापूर्वी २०१६मध्ये चार बाळे जन्माला आली होती,’ असे जिल्हा रुग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभाग (एसनसीयू) प्रमुख डॉ. सुरेश लाटणे यांनी सांगितले.

मुलीच्या कुंडलीत मंगळ, अल्पवयीन मुलासोबत लग्न; अचानक पोलिसांची एन्ट्री, नेमकं काय घडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed